धुळे पोलिसांनी तब्बल ३१ वर्षांपासून बेपत्ता असलेल्या संशयितास नाशिकमध्ये अटक करण्यात यश मिळविले असून अंबड ठाण्याच्या हद्दीतून त्यास ताब्यात घेण्यात आले.
१९८१ मध्ये धुळ्यातील देवपूर पोलीस ठाण्यात अरुण शिवदास मराठे (५८, गोंदूर, ता. धुळे) याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या विविध गुन्ह्यांतील संशयितांना पकडण्यासाठी धुळे पोलिसांनी मोहीम सुरू केली असून त्याअंतर्गत मराठेचा शोध घेण्यात येऊ लागला. मराठे हा नाशिक येथील सिडको परिसरात वास्तव्यास असल्याची माहिती मिळाल्यानंतर देवपूर ठाण्याचे पोलीस पथक त्याचा शोध घेण्यासाठी नाशिक येथे दाखल झाले. सापळा रचून त्यास अटक करण्यात आली.