वंदेमातरम् आणि हज हाऊससाठी एकाच वेळी काम सुरू केले जाईल. तसेच समांतर पाणीपुरवठाप्रश्नी सरकारकडे वेगवेगळ्या प्रकारच्या तक्रारी आल्या असून त्याची नियमानुसार चौकशी करून कारवाई केली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. जिल्ह्य़ातील दुष्काळाच्या पाहणीसाठी आलेल्या मुख्यमंत्री चव्हाण यांनी या दोन राजकीय घोषणा पत्रकार बैठकीत केल्या.
जिल्हा दौऱ्यात घेण्यात आलेल्या विविध कार्यक्रमात राजकीय बांधणीही करण्याचे प्रयत्न सुरू झाल्याचे संकेत मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यादरम्यान जाणीवपूर्वक दिले गेले.
गेल्या काही दिवसांपासून वंदेमातरम् आणि हज हाऊस कोठे बांधावयाचे यावरून बराच वाद होता. जागा निश्चित होत नसल्याने शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे तीनही पक्ष आपापल्या पद्धतीने या विषयाचे राजकारण करत होते. राष्ट्रवादी काँग्रेसने हज हाऊससाठी सह्य़ांची मोहीम सुरू केली. त्याचदरम्यान नागपूर अधिवेशनात वंदेमातरम् आणि हज हाऊसबाबतचा धोरणात्मक निर्णय घेण्यात आला. शनिवारी या दोन्हीही सभागृहांचे कामकाज एकाच वेळी सुरू केले जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. पत्रकार बैठकीत महापालिकेच्या बरखास्तीचा प्रश्नही विचारला गेला. महापालिकेच्या काही तक्रारी राज्य सरकारला प्राप्त झाल्या असल्याचे चव्हाण यांनी सांगितले. विशेषत: समांतर पाणीपुरवठय़ाच्या अनुषंगाने तक्रारी आल्या आहेत. त्याची नियमानुसार चौकशी होऊन कारवाई केली जाईल, असे ते म्हणाले.
जिल्ह्य़ात काँग्रेसच्या कोणत्या कार्यकर्त्यांला बळ द्यायचे हे ठरवून मुख्यमंत्र्यांचे कार्यक्रम आखण्यात आल्याची चर्चा आहे. शुक्रवारी रात्री मुख्यमंत्री जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुरेश पाटील यांच्या घरी भोजनासाठी गेले होते. शनिवारी जिल्हा बँकेच्या कोअर बँकिंग प्रणालीचे उद्घाटन झाल्यानंतर सुरेश पाटील यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते जाहीर सत्कारही करण्यात आला. सन २००० मध्ये जिल्हा बँकेचा तोटा ११४ कोटी रुपये होता. तो भरून काढून जिल्हा बँकेला पाच कोटी रुपये नफ्यात आणणारे नेतृत्व म्हणून सुरेश पाटील यांचा सत्कार राजकीयदृष्टय़ा चर्चेचा विषय होता. विशेष म्हणजे तापडिया टॉवर येथे झालेल्या जाहीर सभेत हा सत्कार व्हावा यासाठी पालकमंत्री बाळासाहेब थोरातही आग्रही होते. त्यामुळे शहरात आणि जिल्ह्य़ात कोणत्या कार्यकर्त्यांला बळ द्यायचे, याचे संकेत आवर्जून देण्यात आले. मुख्यमंत्र्यांची प्रकृती फारशी ठीक नव्हती. सिल्लोड येथील दुष्काळ परिषदेच्या कार्यक्रमाला ते जातात की नाही, अशी शंका व्यक्त केली जात होती. मात्र, काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार यांनी निमंत्रण दिलेले असल्याने त्या कार्यक्रमातही मुख्यमंत्र्यांनी हजेरी लावली.

आमदार नाराज
काँग्रेस पक्षाच्या आमदारांना आवर्जून बरोबर घेणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि अपक्ष आमदारांना दिलेला शब्द पाळला नसल्याची टीका अपक्ष आमदार प्रशांत बंब यांनी केली. मराठवाडय़ातील आमदार समन्यायी पाणी वाटपाच्या प्रश्नी मुख्यमंत्र्यांना ज्या ज्या वेळी भेटले त्या त्या वेळी या प्रश्नावर औरंगाबाद येथे विस्ताराने चर्चा करू, असे आश्वासन त्यांनी दिले होते. शनिवारी औरंगाबाद जिल्ह्य़ाच्या दौऱ्यादरम्यान मराठवाडय़ातल्या आमदारांना निमंत्रणेही दिली नाही आणि विश्वासात घेऊन पाण्याच्या अनुषंगाने चर्चाही केली नाही, असे आमदार बंब यांनी नमूद केले. मराठवाडय़ातल्या अन्य आमदारांनीही या विषयी नाराजी व्यक्त केली.