मध्य रेल्वेच्या तिकीट दलालखोरीविरोधी पथकाने विरार येथे केलेल्या कारवाईत दलाली होणाऱ्या तिकिटांची संख्या पाहून रेल्वे प्रशासन हडबडले आहे. या दलालांनी तब्बल ४८००हून अधिक तिकिटांचे आरक्षण केले होते. सुटय़ांच्या मोसमात यामुळेच अनेकदा उपलब्ध तिकिटांची संख्या कमी असल्याचे दिसत होते. तिकीट दलालीमागील दोन दलालांचा पर्दाफाश केल्यानंतर या दलालीला आळा घालण्यासाठी रेल्वे प्रशासन विविध उपाय शोधत आहे. यातूनच मध्य रेल्वेच्या वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापकांनी तिकीट आरक्षणावेळी ‘वन टाइम पासवर्ड’चा पर्याय समोर ठेवला आहे.
विरार येथील कारवाईत १० संगणकांवरून एका मिनिटाला हजाराहून अधिक तिकिटे आरक्षित होत असल्याचे आढळले होते. यासाठी वापरण्यात येणारे सॉफ्टवेअर भारताच्या पूर्व भागातून येत असल्याचेही समजत आहे. या दलालांनी या सॉफ्टवेअरच्या आधारे तब्बल ४८३५ पीएनआर आरक्षित केले होते. या प्रत्येक तिकिटातील प्रत्येक आसनामागे त्यांनी शंभर रुपये दलाली घेतली होती. त्यामुळे हा खूपच मोठा घोटाळा असल्याचे उघडकीस आले होते.
सुटय़ांच्या मोसमातील गाडय़ांची तिकिटे काही मिनिटांतच आरक्षित होण्यामागेही या दलालीचा हात असल्याचे रेल्वे अधिकारी सांगतात. ही दलाली पूर्णपणे थांबवता येईल का, याबाबत आता रेल्वे प्रशासनामध्ये विचारविनिमय सुरू आहे. त्यातूनच मध्य रेल्वेचे वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉ. आलोक बडकुल यांनी ‘वन टाइम पासवर्ड’चा पर्याय सुचवला आहे.
अनेक बँकांच्या व्यवहारांमध्ये किंवा ऑनलाइन खरेदी करताना मोठय़ा रकमेची खरेदी असल्यास संबंधित संकेतस्थळ तुमच्याकडे तुमच्या मोबाइल क्रमांकाची विचारणा करते. त्या मोबाइल क्रमांकावर संदेशाद्वारे हा ‘वन टाइम पासवर्ड’ पाठवला जातो. तो पासवर्ड रकान्यात भरल्यानंतरच तुमचा व्यवहार पूर्ण होतो. त्यामुळे तुमचा मोबाइल क्रमांक त्या संकेतस्थळावर नोंदला जातो. रेल्वे आरक्षण प्रणालीतही या वन टाइम पासवर्डचा उपयोग केल्यास दलालीला मोठय़ा प्रमाणात आळा बसेल, असे डॉ. बडकुल यांनी स्पष्ट केले.
सध्या ऑनलाइन आरक्षण करताना आयपी अ‍ॅड्रेसवर नियंत्रण ठेवणे शक्य नाही. विरार दलालीच्या संदर्भातही या दलालांनी अनेक बनावट आयपी अ‍ॅड्रेस निर्माण करून त्यावरून आरक्षण केले होते. मात्र ‘वन टाइम पासवर्ड’चा वापर आरक्षण प्रणालीत सुरू झाल्यास तुमचा मोबाइल क्रमांक देणे अनिवार्य राहील. एकाच मोबाइल क्रमांकावरून दोन किंवा त्यापेक्षा जास्त पीएनआर आरक्षित केले जात असतील, तर त्याला आळा घालणे शक्य होणार आहे. तसेच हा पासवर्ड तुमच्या मोबाइलवर येऊन तो तुम्ही संबंधित पट्टय़ात टाकण्यासाठी काही काळ जावा लागेल. त्यामुळे तिकिटांची दलाली आताएवढी सहज होणार नाही व त्याला पायाबंद घालता येईल, असे डॉ. आलोक बडकुल यांनी सांगितले.
‘वन टाइम पासवर्ड’शिवाय इतरही पर्यायांचा विचार रेल्वे करत आहे. त्यात आरक्षण करताना तुमचा आधार कार्ड क्रमांक टाकणे, पॅनकार्ड क्रमांकाचा आधार घेणे असे विविध पर्याय आहेत. मात्र या सर्व पर्यायांबाबत रेल्वे बोर्ड आणि रेल्वे मंत्रालय विचार करेल. त्यानंतर प्रणाली तयार करणाऱ्या ‘क्रिस’ संस्थेला याबाबत विचारणा करण्यात येईल, असे डॉ. बडकुल यांनी स्पष्ट केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा