पीकचोरीचा गुन्हा दाखल करण्यास ७ हजारांची लाच मागणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक विजय मिठपल्ले यास एक वर्ष सक्तमजुरी व ३ हजार रुपये दंडाची शिक्षा वसमत जिल्हा व सत्र न्यायालयाने सुनावली.
वसमत तालुक्यातील राजाळा येथील शेतकरी दिगंबर दत्तात्रय वैद्य यांच्या शेतात सोयाबीनची चोरी झाली होती. चोरीची फिर्याद देण्यास गेलेल्या वैद्य यांना मिठपल्ले याने ७ हजार रुपयांची लाच मागितली. मिठपल्ले तेव्हा हट्टा पोलीस ठाण्यात उपनिरीक्षक म्हणून कार्यरत होता. वैद्य यांनी लाचलुचपत विभागाकडे ३० नोव्हेंबर २००९ रोजी तक्रार केली. लाचलुचपत अधिकाऱ्यांनी वसमत येथील जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोप दाखल केले. सरकारी वकील श्रीधर पंचलिगे यांचा युक्तिवाद ग्राह्य़ धरून मिठपल्ले यास वरीलप्रमाणे शिक्षा सुनावण्यात आली.