उगाच भानगडी नको म्हणून सहसा पोलिसांना मदत करण्यासाठी कोणीही पुढे येताना दिसत नाही. मात्र, भिवंडीतील काही तरुणांनी जीव धोक्यात घालून एका आरोपीला पकडले आहे. या आरोपीने पिस्तुल दाखवून सरफाकडील पावणेचार लाख रुपयांचे सोन्याचे दागिने लुटून पळ काढला होता. विशेष म्हणजे, मुंबई येथील वर्सोवा तसेच अंधेरीमधील दरोडा आणि जबरी चोरीच्या गुन्ह्य़ात त्याला शिक्षा झाली असून सहा महिन्यांपूर्वी पॅरोलवर बाहेर आल्यानंतर तो पुन्हा कारागृहात परतला नव्हता. त्यामुळे पोलीसही त्याच्या शोधात होते. दरम्यान, ठाणे ग्रामीण पोलिसांनी त्याच्याकडून दागिने तसेच हत्यारे जप्त केली असून त्याच्या तीन साथीदारांचा शोध सुरू आहे.
बिपनचंद्र बिश्त (२६) असे यातील आरोपीचे नाव असून तो मूळचा उत्तरांचलमधील नैनीतालचा आहे. तर सुनील मल्होत्रा (रा. उत्तरप्रदेश), अभय यादव (रा. बिहार) व सतीश पाठक (रा. दिल्ली) अशी त्याच्या साथीदारांची नावे आहेत.भिवंडी येथील वज्रेश्वरी भागातील परेश एकनाथ क्षीरसागर (३३) यांचे सप्तश्रृंगी ज्वेलर्स हे दुकान आहे. सोमवारी सायंकाळी दुकान बंद करून ते पावणेतीन लाख रुपयांचे सोन्याचे दागिने एका बॅगेत घेऊन  घरी जात होते. त्यावेळी बिश्तने पिस्तुलचा धाक दाखवून त्यांची मोटारसायकल अडविली  या प्रकारामुळे त्यांनी आरडाओरड केली असता, ग्रामस्थ त्या ठिकाणी येऊ लागले. हे पाहून तिघेजण कारमधून शिरसाड फाटय़ाच्या दिशेने पळाले तर दागिन्यांची बॅग घेऊन बिश्त हा अकलोली बायपासच्या दिशेने पळाला. दरम्यान वज्रेश्वरीमधीलवज्रेश्वरी येथील दर्षण कदम, नितीन गायकर, भूपेंद्र शहा, सचिन शिंदे, सुहास राऊत, अमित राऊत, अविनाश राऊत, स्वप्नील शिंदे आणि संकेत कोंडलेकर या तरुणांनी मोठय़ा धाडसाने बिश्तला पकडले. व पोलिसांच्या ताब्यात दिले.  

Story img Loader