अजनी पोलीस ठाण्यातील चार्लीनी पुण्यातील एका तरुणाला अटक करून त्याच्या ताब्यातून देशी कट्टा व दोन जिवंत काडतुसे जप्त केले. रोहित उत्तम शितवले असे त्याचे नाव असून तो दौंड (पुणे) जवळच्या शितलेवाडी येथील रहिवासी आहे.
अजनी ठाण्यातील चार्ली अभिषेक हरदास आणि पंकज सुरजुसे हे दोघे शनिवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास नरेंद्रनगर परिसरात दुचाकीने गस्त करीत होते. यावेळी त्यांना एक तरुण येताना दिसला. त्याचे संशयास्पद वर्तन पाहून चार्लीनी त्याला थांबण्यास सांगितले. परंतु न थांबता पळून गेला. चार्लीनी पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतले. त्याची तपासणी केली असता त्याच्याजवळ देशी कट्टा आणि दोन जिवंत काडतुसे आढळून आली. याप्रकरणी अजनी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवून त्याला अटक करण्यात आली. त्याने हा देशी कट्टा उत्तरप्रदेशातून आणला आहे.
या देशी कट्टय़ाच्या धाकावर प्रेयसीचे अपहरण करायचे होते, असे त्याने पोलिसांना सांगितले. परंतु पोलीस दुसऱ्याही बाजूने तपास करीत आहेत.

Story img Loader