मुंबई महापालिकेतील स्थापत्य समिती (शहर), स्थापत्य समिती (उपनगरे) आणि सार्वजनिक आरोग्य समितीवर पुन्हा एकदा शिवसेना-भाजप युतीने भगवा फडकविला. स्थापत्य समिती (शहर)च्या अध्यक्षपदी शिवसेनेच्या किशोरी पेडणेकर, स्थापत्य समिती (उपनगरे)च्या अध्यक्षपदी भाजपचे कृष्णा पारकर विजयी झाले. तर सार्वजनिक आरोग्य समितीचे अध्यक्षपद पुन्हा एकदा गीता गवळी यांनी राखले.
स्थापत्या समिती (शहर) समितीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत १९ मते मिळवून शिवसेनेच्या किशोरी पेडणेकर विजयी झाल्या. त्यांच्या विरोधात निवडणूक लढविणारे काँग्रेस-राष्ट्रवादीचे उमेदवार शांतिलाल दोषी यांना १० मते मिळाली. उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत युतीच्या वीणा जैन १९ मते मिळवून विजयी झाल्या. त्यांच्या प्रतिस्पर्धी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या उमेदवार रत्ना महाले यांना १० मते मिळाली. या निवडणुकीत पाच सदस्य अनुपस्थित होते, तर दोघे मतदानाच्या वेळी गैरहजर राहिले.
स्थापत्य समिती (उपनगरे) समितीच्या अध्यक्षपदी भाजपचे कृष्णा पारकर बिनविरोध निवडून आले. उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत युतीच्या लीना शुक्ला १९ मते मिळवून विजयी झाल्या. त्यांच्या प्रतिस्पर्धी उषा कांबळे यांना १० मते मिळाली. या निवडणुकीत २९ सदस्यांपैकी ५ जण अनुपस्थित होते, तर दोघे तटस्थ राहिले.
सार्वजनिक आरोग्य समितीच्या अध्यक्षपदी १७ मते मिळवून युतीच्या उमेदवार गीता गवळी विजयी झाल्या. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या परमिंदर रतनसिंग भमरा यांना ९ मते मिळाली. उपाध्यक्षपदी युतीच्या सुनीता रामनगीना यादव विजयी झाल्या.