‘लेव्ही’च्या प्रश्नावर तात्पुरता तोडगा निघाल्याने बुधवारी नाशिक जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांमध्ये कांदा लिलाव सुरू झाले. सलग दोन दिवस बंद राहिलेले लिलाव सुरू झाल्यानंतर या दिवशी कांद्याचे भावही काहीसे वधारले. लासलगाव बाजार समितीत मागील आठवडय़ाच्या तुलनेत कांदा भावात सुमारे २०० रुपये प्रतिक्विंटल वाढ झाली. गुरुवारपासून आवक वाढल्यानंतर बाजारातील स्थिती नियमित होईल, असा या क्षेत्रातील जाणकारांचा अंदाज आहे. कांद्याची भाववाढ रोखण्यासाठी केंद्र सरकारने निर्यातमूल्य वाढवून त्याच्या निर्यातीवर बंधन घातले, असे असूनही बुधवारी भावात वाढ नोंदविली गेली.
कांदा खरेदी-विक्रीच्या घाऊक व्यवहारात लेव्हीच्या वादावर १० जुलैपर्यंत शासनामार्फत कायमस्वरुपी तोडगा काढला जाईल, तोपर्यंत आहे त्या परिस्थितीत कांदा लिलाव सुरू करण्यास व्यापारी आणि माथाडी कामगारांनी सहमती दर्शविल्याने जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांमध्ये कांदा लिलाव पूर्ववत झाले. दोन दिवस लिलाव बंद राहिल्यामुळे या दिवशी मोठय़ा प्रमाणात माल बाजारात येईल अशी शक्यता होती. परंतु, मंगळवारी सायंकाळी उशिराने हा निर्णय झाल्यामुळे बुधवारी भरघोस आवक झाली नाही. लासलगाव बाजार समितीत सकाळच्या सत्रात साधारणत: ३०० ट्रॅक्टर कांदा दाखल झाला. साधारणत: ८ ते १० हजार क्विंटल कांद्याची आवक झाली. त्यास किमान ४०० ते कमाल १८६१ असा भाव मिळाला. सरासरी भाव १३२५ रुपये होता. या बाबतची माहिती समितीचे सभापती नानासाहेब पाटील यांनी दिली. दुपारी आणखी २५० ट्रॅक्टर बाजार समितीत दाखल झाले.

पिंपळगाव बसवंत, मनमाड, येवला, सटाणा, मालेगाव अशा सर्व बाजार समित्यांमध्ये कांद्याचे दैनंदिन व्यवहार सुरळीत झाल्याचे जिल्हा उपनिबंधक सुनील बनसोड यांनी सांगितले. बाजार उघडण्याचा बुधवार या आठवडय़ातील पहिलाच दिवस होता. लिलाव सुरू होणार असल्याची माहिती आदल्या दिवशी सायंकाळी जाहीर झाली. यामुळे सकाळी लगेचच अनेकांना माल बाजारात आणता आला नाही. गुरुवारपासून बाजारात स्थिती नियमित होईल, असे पाटील यांनी नमूद केले. सध्या बाजारात येणाऱ्या कांद्याची प्रतवारी वेगवेगळी आहे. गारपीट व अवकाळी पावसामुळे कांद्याच्या दर्जावर परिणाम झाला आहे. चाळीत साठविलेला कांदा खराब होत असल्याने तो विक्रीसाठी आणला जात आहे. तसेच दिल्लीसह इतर महानगरांमध्ये कांद्याचे किरकोळ बाजारातील भाव वाढल्यामुळे केंद्र सरकारने निर्यातमूल्य ३०० डॉलपर्यंत वाढविले. त्यामुळे भाव आटोक्यात येतील, हा अंदाज फोल ठरला. कारण, मागील आठवडय़ाच्या तुलनेत बुधवारी भावात काहीशी वधारणा झाली.
आवक सुरळीत झाल्यावर भाव काहीसे स्थिर होतील. पण, सध्या लिलाव पूर्ववत झाले तरी लेव्हीचा वादग्रस्त ठरलेल्या विषयावर तोडगा काढण्याचे आव्हान सहकार विभागासमोर आहे. कांदा लिलावात तोलाईचे काही काम इलेक्ट्रॉनिक वजन काटय़ावर होते तर काही वेळा ‘हैड्रॉलिक’ ट्रॅक्टरद्वारे माल उतरविला जातो. यात माथाडी कामगारांचा कुठेही संबंध येत नसताना त्याचे पैसे देण्यास व्यापाऱ्यांचा विरोध आहे. या प्रश्नावर १० जुलैपर्यंत तोडगा काढण्याचे आश्वासन पणन मंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांनी दिले आहेत. हा तोडगा न निघाल्यास पुन्हा बेमुदत बंदचा
इशारा व्यापाऱ्यांनी दिला आहे. यामुळे लिलाव आज पूर्ववत झाल्याचे चित्र असले तरी पुढील काळात हा पुन्हा वादाचा मुद्दा ठरणार असल्याची धास्ती शेतकरी वर्गात आहे. व्यापारी व माथाडी कामगार यांच्या वादात नाहक शेतकरी भरडला जात असल्याची प्रतिक्रिया उमटत आहे.

Story img Loader