मागील आठवडय़ात घाऊक बाजारात साठी गाठलेल्या कांद्याने सोमवारी अचानक खरेदीदारांनी पाठ फिरवल्याने तीन रुपयांची आपटी खाल्ली. त्यामुळे सकाळी दहा वाजेपर्यंत साठ रुपये किलोने विकला गेलेला कांदा दुपारनंतर ५६ ते ५७ रुपयांनी विकावा लागल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. त्यात नाशिक जिल्ह्य़ातील साठवणूक चाळींचा जिल्हाधिकाऱ्यांच्या वतीने झाडाझडती सुरू झाल्याने या आठवडय़ात कांद्याची आवक वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कांद्याची दरवाढ आणखी होईल आणि आपण बक्कळ पैसा कमवू या विचारात काही शेतकऱ्यांनी कांदा चाळीत साठवून ठेवल्याने ही झाडाझडती सुरू झाली आहे.देशात कांद्याचा तुटवडा भासू लागल्याने कांद्याने किमतीची शंभरी गाठण्याकडे वाटचाल सुरू केल्याचे चित्र आहे. त्यामुळे संपूर्ण मुंबई आणि आजूबाजूच्या भागाला शेतमाल पुरवठा करणाऱ्या तुर्भे येथील एपीएमसीच्या कांदा बाजारात शुक्रवारी कांद्याने साठी गाठली होती. त्यामुळे किरकोळ बाजारात हाच कांदा सत्तरीपर्यंत गेला होता. त्यामुळे कांद्याची वाटचाल शंभर रुपये किलोकडे होत आहे असे दिसत असतानाच केंद्र सरकारच्या परवानगीने काही निर्यातदारांनी इजिप्तहून दहा हजार टन कांदा आयात केल्याने कांद्याची बाजारातील आवक काही प्रमाणात वाढल्याचे दृश्य आहे. त्यात आंध्र प्रदेशातील कांद्यानेही महाराष्ट्रातील ग्राहकांना दिलासा दिला असून सोमवारी पुन्हा आठ ट्रक भरून कांदा घाऊक बाजारात आल्याची नोंद आहे. कांद्याची आवक वाढण्याची भीती लक्षात घेऊन कांद्याचे दर आता कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यात खरेदीदारांनी घाऊक बाजाराकडे पाठ फिरवल्याने साठ रुपये प्रति किलोचा दर घेऊन बसलेल्या व्यापाऱ्याने दुपारनंतर आहे तो कांदा विकला जावा म्हणून चक्क दोन-तीन रुपये कमी करून विकण्यास सुरुवात केली. यात शेकडो किलो कांदा विकत घेणारे खरेदीदार आता बोटावर मोजण्या इतके किलो कांदे घेऊन जात असल्याने दर कमी करण्याशिवाय व्यापाऱ्यांना दुसरा पर्याय नाही. हीच स्थिती या आठवडय़ात राहिल्यास कांद्याचे भाव आणखी कमी होण्याची शक्यता आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा