कांद्याचे किमान निर्यात मूल्य कमी करूनही भावातील घसरण रोखणे शक्य झाले नसल्याची बाब सोमवारी स्पष्ट झाली. भाव गडगडण्याची प्रक्रिया सुरूच राहिल्याने शेतकऱ्यांच्या आंदोलनाचे सत्र सुरूच आहे. मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीत सोमवारी कांदा सरासरी ८३० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत कोसळल्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी थेट मालेगाव रोड चौफुलीवर येऊन रास्तारोको केले. पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप केल्यामुळे आंदोलकांची पळापळ उडाली. त्यानंतर पुन्हा मनसे व शिवसेनेचे कार्यकर्ते एकत्र आले. त्यांच्या नेतृत्वाखाली त्याच ठिकाणी पुन्हा रास्ता रोको करण्यात आला. या प्रश्नावर बाजार समिती संचालकांकडून केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांना साकडे घातले जाणार आहे.
कांद्याचे किमान निर्यात मूल्य ३५० डॉलरवर आणल्यानंतर भावातील घसरणीला लगाम बसेल असे या क्षेत्रातील जाणकारांचे अंदाज फोल ठरले. सोमवारी मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रमी म्हणजे ११ हजार क्विंटल आवक झाली. त्यास किमान ४०० ते कमाल ९२२ रुपये असा भाव जाहीर झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता पसरली. ८०० डॉलरवर असणारे किमान निर्यात मूल्य ३५० डॉलरवर आणल्यामुळे कांदा भावात काहिशी वाढ होईल, असा सर्वाचा अंदाज होता. तथापि, बाजारात भाव वधारण्याऐवजी पुन्हा घसरले. यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी रास्ता रोको सुरू केले. बाजार समिती सभापती प्रकाश घुगे व संचालकांनी हस्तक्षेप केला. बाजार समिती आवारात द्वार सभा घेत शेतकऱ्यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. यावेळी बाजार बेमुदत बंदचा इशारा देण्यात आला. मनसेचे जिल्हा चिटणीस कांतीलाल चौभे, जिल्हा संघटक राजेंद्र पवार आदींची भाषणे झाली. तसेच बाजार बेमुदत बंद जाहीर करण्यात आला.
अखेर बाजार समिती सभापती घुगे यांनी हस्तक्षेप करून निर्माण झालेल्या परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी व्यापारी, राजकीय पक्षांचे कार्यकर्ते, शेतकऱ्यांचे प्रतिनिधी, बाजार समितीचे संचालक यांची तातडीची बैठक बोलावली. त्यात व्यापाऱ्यांबरोबर चर्चा होऊन अखेर योग्य भाव मिळतील या अटीवर बाजार समितीत पुन्हा लिलाव सुरू झाले. तेव्हा भाव १३०० रुपये क्विंटल पर्यंत वधारले. त्यामुळे शेतकऱ्यांनी लिलावावरील बहिष्कार मागे घेतला. चर्चेत बाजार समितीचे संचालक व्यापारी प्रतिनिधी आदींनी भाग घेतला. दरम्यान, केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार हे मंगळवार व बुधवार या दोन्ही दिवशी नांदगाव तालुक्याच्या दौऱ्यावर येत असून यावेळी न्सर्व बाजार समित्यांचे सभापती, संचालक, सर्व पक्षीय प्रतिनिधी, व्यापारी व शेतकरी संयुक्त रित्या शिष्टमंडळाद्वारे त्यांची भेट घेणार आहे. कांद्याच्या भावाबात निर्माण झालेल्या नाजूक परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी त्यांना साकडे घालण्यात येणार आहे, तसेच हमीभाव मिळण्याबाबत आग्रह धरला जाणार आहे