लासलगाव बाजार समितीत आदल्या दिवशी कांदा लिलाव बंद पाडण्यात आले होते. लाल कांद्याची आवक मोठय़ा प्रमाणात वाढत असताना केंद्र सरकार किमान निर्यातमूल्य कमी करण्यास तयार नाही. परिणामी, कांदा भावात सुरू असलेली घसरण अशीच कायम राहिल्यास पुढील काही दिवसात हे भाव ५०० ते ६०० रुपयांची पातळी गाठतील, अशी धास्ती शेतकऱ्यांना आहे. दिवाळीपूर्वी पाच हजार रुपये क्विंटल असणारा कांदा आता सरासरी १४०० ते १५०० रुपये क्विंटलपर्यंत गडगडला आहे. या भावात उत्पादन खर्च भरून निघणेही अवघड झाल्यामुळे शेतकरी संतप्त झाला आहे. त्याची परिणती आंदोलनात झाल्याचे चित्र आहे. लासलगाव बाजार समितीत गुरूवारी कांदा भाव सरासरी १०० रुपयांनी घसरून १४५७ रुपयांवर आले. लिलावात हा भाव जाहीर झाल्यामुळे शेतकरी अस्वस्थ झाले. शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष शिवाजीराव राजोळे, शंकर खालकर व शंकरराव कुटे यांच्या नेतृत्वाखाली सलग दुसऱ्या दिवशी या बाजार समितीत कांद्याचे लिलाव दुपारी बंद पाडण्यात आले. या दिवशी १२०० वाहनातून कांद्याची आवक झाली होती. सकाळी त्याला किमान १००० तर कमाल १७७९ रुपये भाव मिळाला.
मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरूवारी विक्रमी १२ हजार क्विंटल कांद्याची आवक झाली. त्याचा भाव ४०० रुपयांनी गडगडल्याने संतप्त शेतकरी रस्त्यावर आले. बाजार समितीच्या संचालकांसह, व्यापारी व उत्पादक शेतकऱ्यांनी मालेगाव चौफुलीवर रास्ता रोको केले. बाजार समिती सभापती प्रकाश घुगे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनास ‘स्वाभिमान’च्या कार्यकर्त्यांनीही पाठींबा दिला. मनमाड बाजार समितीत सरासरी भाव घसरून १४११ रुपयांवर आला. यामुळे शेतकरी संतप्त झाले व त्यांनी लिलाव बंद पाडून निषेधाच्या घोषणा देत रस्त्यावर धाव घेतली. बाजार समिती सभापती प्रकाश घुगे, संचालक मोतीराम कातकडे, राजेंद्र पवार आदींनी व व्यापाऱ्यांनी उत्पादक शेतकऱ्यांशी चर्चा केली. पण अखेर परिस्थिती लक्षात घेऊन सर्वानी रास्ता रोकोसाठी मालेगाव चौफुली गाठली.
अचानक झालेल्या या प्रकाराने पोलीस यंत्रणेची धावपळ उडाली. चांदवड, मालेगाव चौफुलीवर शेतकऱ्यांनी रास्ता रोकोसाठी ठाण मांडले. शासनविरोधी घोषणा दिल्या. एव्हाना रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या मोठय़ा लांबच लांब रांगा लागल्या. व्यापारीही आंदोलनात सहभागी झाले.
कांद्याचे निर्यातमूल्य तातडीने कमी न झाल्यास सोमवारपासून बाजार समितीमधील सर्व लिलाव बंद करण्यात येतील असा इशारा यावेळी देण्यात आला. सध्या खरेदी होत असलेला माल देशांतर्गत विकला जात
आहे त्यामुळे कांद्याचा भावात घसरगुंडी झाल्याचे बाजार समिती व व्यापाऱ्यांकडून सांगण्यात आले.
जिल्ह्यात कांद्याचे भाव गडगडण्याची प्रक्रिया सुरू असल्याने सलग दुसऱ्या दिवशी शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडत संतप्त भावना व्यक्त केल्या. मनमाड येथे शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडून रास्ता रोको केला तर लासलगाव बाजार समितीत शेतकऱ्यांनी लिलाव रोखून धरले. किमान निर्यात मूल्य कमी करून कांदा निर्यातीचा मार्ग मोकळा करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. निर्यातमूल्याविषयी त्वरित निर्णय न घेतल्यास सोमवारपासून बाजार समितीतील
सर्व लिलाव बंद ठेवण्याचा इशारा देण्यात आला आहे.

Story img Loader