कांद्याचे भाव दहा रुपयांपर्यंत खाली आल्याने शेतक-यांच्या तोंडचे पाणी पळाले असून, निर्यातमूल्य कमी करून कांद्याच्या निर्यातीस प्रोत्साहन देण्याची मागणी बाजार समितीचे संचालक मारुती रेपाळे यांनी केली. दरम्यान, रविवारी पारनेर बाजार समितीच्या आवारात १५ हजार कांदा गोण्यांची आवक झाली. चांगल्या कांद्याला २३ रुपये तर हलक्या कांद्याला १० रुपये प्रतिकिलोचा भाव मिळाला.
समितीमध्ये गेल्या बुधवारी १७ हजार कांदा गोण्यांची आवक होऊन २५ ते ३० रुपये प्रतिकिलोने कांद्याची विक्री झाली. रविवारी मात्र मोठय़ा प्रमाणावर भाव कोसळून १० ते १५ रुपये प्रतिकिलो दराने बहुतेक कांद्याची विक्री झाली. चांगल्या कांद्याला २३ रुपये भाव मिळाला, मात्र या दराने अत्यल्प कांदा विकला गेला. भाव कोसळल्याने शेतकरी हवालदिल झाला असून, किमान उत्पादनखर्च तरी पदरात पडला पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तालुक्यात सध्या मोठय़ा प्रमाणावर कांद्याची लागवड झाली असून, एकरी उत्पादन कमी निघत असल्याने कमी भाव मिळाल्यास शेतक-यांना मोठी आर्थिक झळ बसत असल्याचे शेतक-यांचे म्हणणे आहे.
कांद्याला योग्य भाव मिळून शेतक-यांच्या हाती चार पैसे शिल्लक ठेवायचे असतील तर निर्यातमूल्य कमी करून निर्यातीस प्रोत्साहन देण्याची गरज आहे. सरकारकडून सध्या प्रतिटन ९५० रुपये निर्यातमूल्य आकारले जाते हे मूल्य प्रतिटन २५० ते ३०० रुपये केल्यास आपोआप निर्यात वाढून कांद्याचे भावही वाढतील असे रेपाळे यांनी सांगितले.