सटाण्यात चार तास रास्ता रोको
गेल्या काही दिवसांपासून गगनाला भिडू पाहणारे कांद्याचे भाव सोमवारी अचानक गडगडले आणि शेतकऱ्यांच्या संतप्त भावनांचा उद्रेक झाला. सटाणा शहरात शेतकऱ्यांनी चार तास रास्तारोको केल्यामुळे विंचूर-प्रकाशा, देवळा व मालेगाव रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. या आंदोलनानंतर व्यापारी व शेतकऱ्यांची बैठक झाली. परंतु, त्यातून विशेष असे काही निष्पन्न होऊ शकले नाही.
गेल्या काही दिवसांपासून आवक कमी असल्याने कांद्याचे घाऊक बाजारातील भाव नवीन उंची गाठत आहे. देशभरातून नाशिकच्या कांद्याला चांगली मागणी असल्याने कधी नव्हे ते शेतकऱ्यांच्या हाती दोन पैसे अधिक पडू लागले असताना ही घसरण झाल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली. सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीत सोमवारी सकाळी लिलाव सुरू झाल्यावर कांद्याच्या प्रतिक्विंटल दरात हजार ते बाराशे रूपयांनी घसरण झाली. पहिल्या तीन ट्रॅक्टरला प्रतिक्विंटल २५०० ते २७०० रूपये भाव जाहीर झाला. काही दिवसांपूर्वी तब्बल पाच हजार रूपये प्रति क्विंटलने लिलाव होत असताना भाव अचानक कमी झाल्याने शेतकऱ्यांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटली. त्यांनी शहरातील शिवछत्रपती पुतळा परिसरात ठिय्या दिला. दुपारी चार वाजेपर्यंत हे आंदोलन सुरू राहिल्याने सटाणा, मालेगाव, सटाणा-देवळा तसेच शहरातून जाणाऱ्या विंचूर-प्रकाशा राज्य मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. यावेळी नायब तहसीलदार पल्लवी जगताप यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन मध्यस्ती केली. व्यापारी व शेतकऱ्यांची संयुक्त बैठक घडवून आणण्यात आली. बैठकीत शेतकऱ्यांनी शासनाच्या भूमिकेबद्दल संशय व्यक्त करून निषेध केला. तसेच किमान चार हजार रूपयांहून अधिक भाव देण्याची मागणी केली. यापूर्वी खरेदी करण्यात आलेल्या कांद्याचा प्रश्न प्रलंबित असून कांदा खरेदी शासनाच्या धोरणानुसार केली जात असल्याचे व्यापाऱ्यांनी म्हटले आहे.
सटाणा बाजार समितीत ५०० ट्रॅक्टर कांद्याची आवक झाली. त्यास सरासरी प्रतिक्विंटल ३७६० रूपये भाव मिळाल्याची माहिती बाजार समितीने दिली.
पावसाळ्यात कुंद वातावरण निर्माण झाले की, ठिकठिकाणी भूछत्र अर्थात मशरूम अचानक दृष्टिपथास पडू लागतात. नाशिक शहरातील गोदापार्कचा परिसर देखील सध्या अशा अनेक विविधरंगी भूछत्रांनी फुलल्याचे पहावयास मिळत आहे. हिमालयाच्या दऱ्या-खोऱ्यांमधील वृक्षराजी बर्फवृष्टी झाल्यानंतर कशी दिसेल, याची अनुभूती एकाच ठिकाणी भरगच्चपणे निर्माण झालेले भूछत्र पाहिल्यावर येऊ शकते. काही प्रजातींची भूछत्र मधमाशांच्या पोळ्यासारखी दिसणारी तर काही मखमली फुलांच्या गुच्छासारखी, इतके त्यात वैविध्य आहे. जमीन, वाळू, झाडाचा बुंधा या ठिकाणी ही भूछत्रे प्रामुख्याने वाढत असतात. त्या ठिकाणाहून त्यांना अन्नस्त्रोत उपलब्ध होतो. भूछत्रातील अनेक प्रजाती मध्यरात्रीनंतर उमलायला सुरूवात होते आणि मग त्या वेगाने पसरतात. मशरूमच्या अनेक प्रजाती असून त्यातील काही बिनविषारी तर काही विषारीही असतात. त्यामुळे त्यांना हात लावताना सावधानता बाळगायला हवी. ही दक्षता बाळगून भूछत्रांचे नयन मनोहारी दृश्य नजरेत निश्चित साठवून घ्यायला हवे. (छाया – योगेश खरे)