‘शुभमंगल सावधान’चा उच्चार शास्त्रीबुवांनी केला नि ‘उपस्थित’ सर्वानी अक्षता टाकत नवपरिणीत दाम्पत्यास शुभाशीर्वाद दिले. नागपुरात अलीकडेच पार पडलेल्या या आगळ्या विवाह सोहळ्याचे वैशिष्टय़ म्हणजे खास उपस्थितांमध्ये मुंबई, पुणे, औरंगाबादसह सातासमुद्रापार अमेरिका, कॅनडा या देशांतील आप्तस्वकीयांचाही ‘ऑनलाइन’ असलेला सहभाग. नागपुरातील हा सोहळा वधू-वराचे जवळचे मित्र-मैत्रिणी, तसेच जवळच्या नातलगांनी ऑनलाइन ‘याचि नेत्रे..’ प्रत्यक्ष अनुभवला.
अमरावतीची नवरी नि नागपूरचा नवरदेव यांचा हा विवाहसोहळा काही अपरिहार्य कारणांमुळे प्रत्यक्ष हजर राहता येणे शक्य होऊ न झालेल्या जवळच्या हितचिंतकांसाठी अशा प्रकारे पर्वणी ठरला. नागपूरकर अंकित चौधरी आणि अमरावतीची इशा सोलते यांच्या विवाहाची ही गोष्ट. हे दोघेही अमेरिकेत अनुक्रमे सॉफ्टवेअर इंजिनियर व आयटी प्रोफेशनल म्हणून कार्यरत आहेत. विवाहाच्या रेशीमगाठी आपल्या आप्तस्वकियांसह मूळच्या ठिकाणी सनई-चौघडय़ांच्या निनादात बांधण्याची त्यांची इच्छा फलद्रूप झाली. परंतु या दोघांचे जवळचे काही नातलग व मित्रपरिवार आग्रहाचे निमंत्रण असतानाही प्रत्यक्ष उपस्थित राहू शकले नाहीत. या गैरहजेरीमुळे वधू नि वराकडील मंडळींच्या स्वाभाविक नाराजीचे धनी त्यांना व्हावे लागले.
परंतु ही नाराजी मोठय़ा मनाने बाजूला ठेवत संयोजकांनी नामी युक्ती शोधली. त्याचीच परिणती म्हणजे मुंबई, पुणे, औरंगाबाद, नाशिकसह थेट साता समुद्रापार असलेल्या सगेसोयरे, नातलग नि मित्रपरिवाराची विवाहसोहळा प्रत्यक्ष ‘पाहण्या’ची इच्छा पूर्ण केली. सोमवारी (दि. ८ जानेवारी) सकाळी १० वाजून २६ मिनिटांची लग्नतिथी होती. वेळेवर पार पडलेला हा सोहळा या सर्वच शरीराने (मनाने मात्र नव्हे!) दूर असलेल्या मंडळींनी ऑनलाइन पाहिला नि ‘शुभमंगल’चा गजर होताच संगणकापुढे अक्षतांची पखरण केली.
या अस्सल मराठमोळ्या विवाहसोहळ्याने प्रत्यक्ष उपस्थित असलेल्या नि उपस्थित राहू न शकलेल्यांना अशा प्रकारे सामावून घेतले. ऑनलाइन सोहळा पाहिलेल्यांमध्ये नवरदेवाची मावशी, औरंगाबादच्या सरस्वती भुवन महाविद्यालयातील प्राध्यापिका डॉ. अलकनंदा दोडके-सुपेकर याही होत्या. त्यांनीच हा सारा वृत्तान्त कथन केला.
झाले असे की, विवाह पार पडण्याच्या साधारण तास-दीड तास आधी संयोजकांनी या सर्वच ठिकाणच्या मंडळींना मोबाईलने ‘एसएमएस’ पाठवून विवाहाला ‘ऑनलाइन’ उपस्थित राहण्यास सांगितले. तोपर्यंत याची काहीही कल्पना नसलेल्या या सर्वानाच याचे अप्रूप वाटले. परंतु लगेच हातातली कामे बाजूला टाकत हा सोहळा मनसोक्त ‘साजरा’ केला. विवाहातील पारंपरिक सोपस्कार, आलेल्या पाहुण्यांचे आगतस्वागत, मंगलाष्टके, सनई-चौघडय़ाचे गूजन, वऱ्हाडी मंडळींची उपस्थिती, भोजनावळ असे सारेच दूरच्या मंडळींनी संगणकाच्या पडद्यावर पाहिले आणि प्रत्यक्ष हजर न राहता आल्याचे शल्य अशा प्रकारे दूर झाल्याने हे सारेच धन्य झाले. या ४ तासांच्या ऑनलाइन प्रक्षेपणासाठी खर्चही माफक, अवघा ८ हजार रुपये आल्याचे संयोजकांनी सांगितले. नागपूरच्या राजवाडा पॅलेस मंगल कार्यालयात (गांधीसागर तलावाजवळ) हा सोहळा पार पडला.

Story img Loader