विदर्भातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प, मेळघाट, पेंच, टिपेश्वर, बोर, नागझिरा व नवेगाव प्रकल्पात प्रवेशासाठी ऑनलाइन बुकिंगला आज सकाळपासून सुरुवात झाली आहे. वन्यजीव विभागाचे प्रधान मुख्य वनसंरक्षक एस.डब्ल्यू.एच. नकवी यांनी पहिली बुकिंग करून ऑनलाइन पर्यटकांच्या ऑनलाइन संकेतस्थळाचे उद्घाटन केले. यामुळे देशविदेशातील पर्यटकांना दोन महिने अगोदर व्याघ्र प्रकल्पातील प्रवेशाचे बुकिंग घरबसल्या करता येणार आहे.
पट्टेदार वाघांसाठी प्रसिद्ध असलेल्या पूर्व विदर्भातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प, नागपूर जिल्ह्य़ातील पेंच व्याघ्र प्रकल्प व गोंदिया जिल्ह्य़ातील नवेगाव-नागझिरा प्रकल्प, तसेच पश्चिम विदर्भातील मेळघाट टायगर रिझव्र्ह, टिपेश्वर, बोर व वनविकास महामंडळाच्या जंगलात पर्यटकांच्या सहज प्रवेशासाठी ऑनलाइन आरक्षण पद्धत सुरू व्हावी, यासाठी गेल्या काही महिन्यांपासून वनखात्याचे प्रयत्न सुरू होते. शेवटी या प्रयत्नांना यश आले असून आज सकाळी व्याघ्र प्रकल्पातील ऑनलाइन बुकिंग पद्धतीला सुरुवात झाली आहे. वनखात्याने http://www.mahaecotourism.gov.in या संकेतस्थळावर बुकिंगची सुविधा उपलब्ध केली आहे. गेल्या महिन्यात ५ ऑगस्टला वनखाते व महाऑनलाइन यांच्यात या संदर्भातील सामंजस्य करार अर्थात, एमओयूवर स्वाक्षऱ्या झाल्या. यावेळी महाऑनलाइनचे मुख्य अधिकारी सतनामसिंग, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक वीरेंद्र तिवारी, पेंच व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक एन.एम.रेड्डी व गोंदियाचे मुख्य वनसंरक्षक गुरमे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा करार झाला होता. यावेळी महाऑनलाइनचे सतनामसिंग यांनी ऑनलाइन आरक्षणाचे संपूर्ण डिझाइन, तसेच कशा पद्धतीने आरक्षण करायचे, याचे प्रात्याक्षिकही दाखविले होते.
त्यानंतर स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर १५ ऑगस्टला या सेवेचा शुभारंभ करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, पुन्हा काही तांत्रिक कारणांमुळे रखडले. शेवटी आज सकाळी वन्यजीव विभागाचे प्रधान मुख्य वनसंरक्षक एस.डब्ल्यू.एच. नकवी यांच्या हस्ते ताडोबा व्याघ्र प्रकल्पाची बुकिंग करून ऑनलाइन बुकिंग पद्धतीचा शुभारंभ झाला. यामुळे देशविदेशातील पर्यटकांना आता इंटरनेटच्या माध्यमातून ऑनलाइन आरक्षण घरी बसूनही करता येणार आहे. ऑनलाइनच्या माध्यमातून केवळ ७० टक्के आरक्षण दिले जाणार असून १५ टक्के आरक्षण संबंधित प्रकल्पाच्या मुख्य प्रवेशव्दारावर पहिले येणाऱ्या पर्यटकांना दिले जाणार आहे, तर १५ टक्के अतिविशिष्ट म्हणजेच व्हीआयपी कोटा ठेवण्यात आलेला आहे. सध्या ताडोबा व इतर सर्व प्रकल्प ३० सप्टेंबपर्यंत बंद आहेत. या काळात केवळ दहा गाडय़ा सोडण्यात येत आहेत. यातील सात गाडय़ांचे आरक्षण ऑनलाइन, तर दीड गाडय़ांचे आरक्षण मुख्य प्रवेशव्दारावर व दीड गाडय़ांचे आरक्षण व्हीआयपी कोटय़ासाठी आहे. १६ ऑक्टोबरपासून ताडोबा पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यानंतर एका दिवसाला म्हणजेच सकाळ व संध्याकाळच्या फेरीत ११७ गाडय़ा सोडण्यात येणार आहेत. त्यावेळी ऑनलाइनमध्ये अधिक प्रवेशक्षमता पर्यटकांना उपलब्ध होणार आहे.
ऑनलाइनमध्ये नागपूर जिल्ह्य़ातील पेंच प्रकल्पासोबतच उमरेड, करहांडला, मानसिंगदेव, बोर प्रकल्प, तर गोंदिया जिल्ह्य़ातील नवेगाव, नागभीड व नवीन नवेगाव, नवीन नागझिरा, अमरावती जिल्ह्य़ातील मेळघाट टायगर रिझव्र्ह, टिपेश्वर, बोर अभयारण्य व वनविकास महामंडळ प्रकल्प जोडण्यात आलेला आहे. ऑनलाइन बुकिंगचा सर्वाधिक फायदा पर्यटकांना होणार असून यामुळे वनाधिकाऱ्यांची डोकेदुखी कमी झाली आहे. पर्यटकांना ६० दिवस पहिले म्हणजे दोन महिन्याच्या अगोदरपासून कुठल्याही व्याघ्र प्रकल्पात प्रवेशासाठी ऑनलाइन बुकिंग करता येणार आहे, तसेच उद्या ७ सप्टेंबरला व्याघ्र प्रकल्पात जायचे असेल तर पर्यटकांना ६ सप्टेंबरच्या सायंकाळी ५.१५ वाजेपर्यंत बुकिंग करता येणार आहे. त्यानंतर बुकिंग करता येणार नाही, अशी माहिती ताडोबा व्याघ्र प्रकल्पाचे उपवनसंरक्षक गिरीश वशिष्ट व सुजय डोडल यांनी लोकसत्ताशी बोलतांना दिली. यासोबतच ऑनलाइन बुकिंग हाऊसफुल्ल झाले नसेल, तर पर्यटकांना प्रवेशद्वारावर प्रवेश तिकीट मिळण्याची सुविधाही आहे. दरम्यान, पर्यटकांनी आता या आधुनिक सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन वनखात्याच्या वतीने करण्यात आले आहे.
ताडोबा कार्यालयातील बुकिंग ऑफिस बंद
ऑनलाइन बुकिंगला सुरुवात होताच ताडोबा (कोअर झोन) प्रकल्पाच्या कार्यालयातील बुकिंग ऑफिस बंद करण्यात आले आहे. संबंधित कंपनी चंद्रपूर व नागपूर येथे एक आरक्षण खिडकी सुरू करणार आहे. त्यामुळे स्थानिक पर्यटकांना यातूनही बुकिंग करता येणार आहे. ताडोबातील मोहुर्ली, खुडवंडा, कोलारा, नवेगाव व कोळसा गेटचे ऑनलाइन बुकिंग झाले आहे. ही ऑनलाइन प्रक्रिया पर्यटकांसाठी अतिशय सोईची आहे. यासोबतच पेंच, टिपेश्वर, बोर, मेळघाट, नवेगांव, नागझिरा येथील वनखात्याच्या कार्यालयातील बुकिंग ऑफिसही बंद होणार आहेत. केवळ ऑनलाइन बुकिंग हाऊसफुल्ल नसेल, तरच प्रवेश गेटवर तिकिटे उपलब्ध करून दिली जाणार आहेत.