निफाड तालुक्यातील दस्त नोंदणीसाठी लासलगावच्या दुय्यम निबंधक कार्यालयात शासनाने ‘आय-सरीता’ ही ऑनलाईन नोंदणीची प्रणाली मोठय़ा दिमाखात सुरू केली असली तरी येथील सव्‍‌र्हरला कनेक्टेव्हिटीच मिळत नसल्याने संगणकीकृत दस्त नोंदणीची कामे ठप्प झाली आहेत. नाशिक शहरासह तालुका पातळीवरील या प्रक्रियेत असेच अडथळे येत असल्याने दस्त नोंदणीस येणारे पक्षकार हैराण झाले आहेत. परिणामी, ‘नवे तंत्र नको तर, आपली जुनीच पद्धत बरी’ अशी प्रतिक्रियाही व्यक्त होत आहे.
नाशिक जिल्ह्यात सर्वच दस्त नोंदणीची प्रक्रिया ऑन लाईन झाली असून त्यात वारंवार ‘डिस्कनेक्ट’ होणारा सव्‍‌र्हर प्रमुख अडचण ठरला आहे. त्याची कनेक्टिव्हीटी गायब होत असल्याने नाशिककरांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. आधी निफाड येथे व काही दिवसानंतर लगेच लासलगावी अलीकडेच ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली. तथापि, दिवसभरात दोन किंवा तीन या पलीकडे दस्त नोंदणी शक्य झाली नाही. सव्‍‌र्हर सातत्याने जॅम असल्याने ही संगणकीकृत प्रक्रिया पुढे सरकू शकत नाही. सुट्टी काढून व दैनंदिन कामकाज सोडून दस्त नोंदणीसाठी येणाऱ्या पक्षकारांना दिवसभर कार्यालयात थांबून रहावे लागते. इतके करूनही दस्त नोंदणी होईल किंवा नाही याची शाश्वती नाही. सव्‍‌र्हरच्या रडकथेमुळे बहुतेक कार्यालयांमध्ये कमी-अधिक प्रमाणात हीच अवस्था आहे. याचा फटका विवाह नोंदणी करणाऱ्या नवदांपत्यांनाही सहन करावा लागत  आहे.
शासनाच्या ठेकेदाराने आवश्यक त्या चाचण्या पूर्ण केल्यानंतर ही ऑनलाईन यंत्रणा कार्यान्वित करणे आवश्यक होते. ही प्रक्रिया जोपर्यंत सुरळीत होत नाही तोपर्यंत ही सेवा सुरू करू नये, असे केंद्र व राज्य शासनाच्या योजनांच्या काँग्रेसच्या सनियंत्रण समितीचे अध्यक्ष गुणवंतराव होळकर यांनी म्हटले आहे. अत्याधुनिक यंत्रणेच्या नावाखाली सर्वसामान्यांना वेठीस धरण्याचा हा प्रकार आहे. या बाबत राज्याचे मुद्रांक महानिरीक्षक सेतुराम चोक्कलिंगम यांच्याशी संपर्क साधण्यात येणार असल्याचे सांगण्यात येते. या व्यवस्थेमुळे कामकाजावर काय परिणाम झाला, त्याकरिता लासलगाव दुय्यम निबंधक कार्यालयातील उदाहरण पुरेसे ठरेल. या कार्यालयात एरवी १५ ते २० खरेदी खते, गहाणखते, साठेखत, करारनामे यासह दस्त नोंदणी होत सते. परंतु, नव्या यंत्रणेमुळे ही संख्या ९० टक्क्यांनी खाली घसरली आहे. नोंदणी प्रक्रियाच ठप्प झाल्याने गजबजणाऱ्या कार्यालय व परिसरात शुकशुकाट असतो. या संदर्भात वरीष्ठ कार्यालयांशी संपर्क साधून ही प्रणाली सुरळीतपणे सुरू करण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती प्रभारी दुय्यम निबंधक राजेंद्र कुटे यांनी दिली. ही यंत्रणा सुरळीत होईपर्यंत दस्त नोंदणीला विलंब लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे वेळेचे नियोजन करून दस्त नोंदणीला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे. कमी-अधिक प्रमाणात संपूर्ण जिल्ह्यात ही स्थिती आहे.   

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा