शहरातील महिलांना घर आणि नोकरी या दुहेरी जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागत असताना वेळेची बचत करणे म्हणजे तारेवरची कसरतच. नोकरी आणि घरातील कामाचे वेळापत्रक सांभाळताना महिलांना नियोजन करणे अत्यावश्यक झाले असून त्यात त्यांना आता ‘ऑनलाईन भाजीवाला डॉट कॉम’ ची साथ मिळणार आहे.
नोकरदार महिलांसाठी कामाच्या रगाडय़ात दररोज काय भाजी करावी आणि बाजारात जाण्यासाठी वेळ कसा काढावा, हा डोकेदुखीचा विषय ठरतो. निवास स्थानापासून बाजारात जाईपर्यंत बराच वेळ खर्ची पडत असल्याने शारीरिक व मानसिक अशा दोन्ही प्रकाराचा त्रास होतो. महिला वर्गाचा हा ताण हलका करण्यासाठी मुंबई, पुण्यानंतर नाशिकमध्ये पहिल्यांदाच ‘ऑनलाईन भाजीवाला डॉट कॉम’ संकल्पना राबविली जाणार आहे. प्रायोगिक तत्वावर गंगापूर रोड परिसरात त्याची सुरूवात होणार असल्याची माहिती मनोहर पाटील यांनी दिली.
रोजच्या धावपळीतील काही निवांत क्षण प्रत्येक जण आपल्या कुटुंबासाठी राखीव ठेवतो. या जबाबदाऱ्या पार पाडत असतांना महिला वर्गाची नेहमी ओढाताण होते. त्यांच्यावरील ताण कमी करण्यासाठी ऑनलाईन भाजीपाला डॉट कॉमची मदत मिळणार आहे. बाजारपेठेत येणारा भाजीपाला हा शेतकऱ्यांकडून व्यापारी, व्यापाऱ्याकडून दलालाकडे, दलालाकडून भाजी विक्रेता  अशी साखळी पूर्ण करत ग्राहकांकडे
येत असतो.
ही संपूर्ण साखळी पूर्ण होताना भाजीपाल्याच्या किंमतीत प्रत्येक साखळीगणिक वाढत होत जाते. वाढलेल्या दराचा फटका ग्राहकाच्या खिशाला बसतो. थेट शेतकऱ्यांकडून माल खरेदी करत ग्राहकांपर्यंत पोहचविल्यास शेतकरी आणि ग्राहक दोघांना फायदेशीर ठरू शकते, हे हेरून पाटील यांनी भाजीवाला डॉट कॉम सुरू करण्याचा निर्णय घेतला. या माध्यमातून उपलब्ध होणारा भाजीपाला हा ताजा असेल. शिवाय बाजारभावाच्या तुलनेत कमी किंमतीचा असेल. या माध्यमातून घरपोच सेवा दिली जाणार असून घरापर्यंत भाजीपाला पोहोचविण्याचे कोणतेही अलग दर राहणार नाहीत, हेही त्यांनी नमूद केले.
ऑनलाईन भाजीपाला खरेदीसाठी अट एवढीच असेल की एक दिवस आधी नोंदणी करावी लागेल. तसेच कमीत कमी १०० रुपये किमतीचा भाजीपाला खरेदी करावा लागणार आहे. जेणेकरून शेतकऱ्यांकडून ताजा माल कमी किंमतीत उपलब्ध होईल याकडे संचालकांना लक्ष देता येणार आहे. प्राथमिक स्वरूपात पारिजात नगर, एबीबी सर्कल, महात्मा नगर, कॉलेज रोड, भोसला कॉलेज, गंगापूर रोड या ठिकाणी हा प्रयोग राबविण्यात येणार आहे. नजिकच्या काळात हा प्रयोग संपूर्ण शहरात राबविण्यात येईल. इच्छुकांनी अधिक माहितीसाठी www.onlinebhajiwala.com    या संकेतस्थळावर किंवा ८४११००००७८ या क्रमांकावर संपर्क साधावा.