वैद्यकीय शिक्षणाचा विचार करता विदर्भात पदवी अभ्यासक्रमाच्या ७५० तर पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या ६५० जागा असताना सुपर स्पेशालिटी अभ्यासक्रमाच्या केवळ पाच जागा आहेत. विदर्भात अपेक्षित असे सुपर स्पेशालिटी तयार न झाल्याने विदर्भातील होतकरू व हुशार विद्यार्थ्यांना देशात अन्यत्र जाऊन सुपर स्पेशालिटीचा अभ्यासक्रम पूर्ण करावा लागतो. नागपूरमध्ये सुपर स्पेशालिटीवर अभ्यासक्रम सुरू झाले, तर विदर्भातील विद्यार्थ्यांना दुसरीकडे जाण्याची गरज भासणार नाही, असे वैद्यकीय क्षेत्रात बोलले जात आहे.
१९९२ ते २०१३ या कालावधीत वैद्यकीय शिक्षणात खासगी क्षेत्राचा समावेश करण्यात आला. त्यामुळे वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या वाढली. सार्वजनिक क्षेत्रात सवलतीचे तर खासगी क्षेत्रात खर्चावर आधारित शिक्षण देणे सुरू झाले. सद्यास्थितीत वैद्यकीय शिक्षणाच्या जबाबदारीतून केंद्र व राज्य सरकारने स्वतला मुक्त केले आहे. त्यामुळे १९९२ ते २०१४ या कालावधीत देशात सुरू झालेल्या २१५ वैद्यकीय महाविद्यालयांपेकी तब्बल ८५ महाविद्यालये खासगी आहेत. विदर्भात अपेक्षित असे सुपर स्पेशालिटी विकसित झाले नाही, त्यामुळे येथील पदवीधर विदर्भाबाहेर जात आहेत. अभ्यासक्रमाच्या एकूण ७५० जागांपैकी ३० टक्के जागा या राज्य व देशपातळीवर विभागण्यात येत आहे. विदर्भातील वैद्यकीय शिक्षणाचा विचार करता नागपुरातील सुपर स्पेशालिटीमध्ये प्लास्टिक सर्जरी (दोन जागा), कार्डीओलॉजी (दोन जागा) आणि गॅस्ट्रोएन्ट्रॉलॉजी (एक जागा) अशा फक्त पाच जागा आहेत. त्यामुळे विदर्भातील विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षणाच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी ‘मास्टर प्लान’ तयार करण्याची आवश्यकता असल्याचे मत इंडियन मेडिकल असोसिएशन, नागपूर शाखेच्या अध्यक्षा डॉ. वर्षां ढवळे यांनी व्यक्त केले.
विदर्भात आरोग्य सेवा झपाटय़ाने विकसित होत आहे. परंतु विदर्भातील दोन कोटी जनतेच्या आरोग्य सेवांची गरज पूर्ण करण्यासाठी अधिक संख्येने डॉक्टर्स तयार करणे आवश्यक आहे. १९७० च्या सुमारास साडेसहा हजार रुग्णांमध्ये एक डॉक्टर असे प्रमाण होते. ते आज १,७०० रुग्णांमागे एक डॉक्टर आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या शिफारसीनुसार हजार रुग्णांसाठी एक डॉक्टर अपेक्षित आहे. त्यामुळे अद्याप ७०० रुग्णांचा भार डॉक्टरांवर आहे. ही दरी भरून काढण्यासाठी ठोस उपाय योजन्याची गरज आहे. नागपुरातील मेडिकल, मेयोमध्ये सुपर स्पेशालिटीच्या जागा स्थापन कराव्यात अशी मागणी आयएमएने भारतीय वैद्यक परिषदेकडे केली होती. अद्यापही प्रयत्न सुरू आहेत. परंतु निकष पूर्ण केले जात नसल्याचे सांगून एमसीआय नवीन जागांना मंजुरी देत नसल्याचेही डॉ. ढवळे यांनी सांगितले. त्यामुळे विदर्भातील होतकरू व हुशार विद्यार्थ्यांना सुपर स्पेशालिटीचे शिक्षण घेण्यासाठी देशातील दिल्ली, चंडीगड, बंगळुरू, चेन्नई, मुंबई, येथे धाव घ्यावी लागते. तर काही विद्यार्थी विदेशात जाऊन सुपर स्पेशालिटीचे शिक्षण घेतात.
विदर्भातील प्रत्येक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी शासनपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. देशातील इतर मेट्रो शहरांच्या तुलनेत नागपुरात दर्जेदार आरोग्य सेवा स्वस्त दरात उपलब्ध आहे. त्यामुळे नागपूर मेडिकल सेवेसाठी हब म्हणून विकसित होत आहे. मेडिकल हब म्हणून विकसित होत असतानाच राज्य सरकारने काही मूलभूत  बाबींकडे लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे. त्यात सुपर स्पेशालिटी अभ्यासक्रम व आरोग्य सेवा यांचा दर्जा उंचावणे आवश्यक आहे.

Story img Loader