नागपूर विद्यापीठाने आयोजित केलेल्या क्रीडा महोत्सवाच्या आयोजनातील काही बाबी वादाचा मुद्दा ठरल्या असतानाच, विद्यापीठ वसतिगृहाच्या केवळ मागील बाजूचीच रंगरंगोटी करून विद्यापीठ प्रशासनाने कंजुषी दाखवली, की दुर्लक्ष करण्याचे धोरण कायम ठेवले, असा प्रश्न विचारला जात आहे.
अश्वमेध क्रीडा स्पर्धासाठी विद्यापीठाने बराच खर्च केला आहे. तथापि, या स्पर्धाच्या उद्घाटनासाठी बांधलेल्या भल्यामोठय़ा व्यासपीठासमोर येणारी विद्यापीठ वसतिगृहाची केवळ मागची बाजूच रंगवण्यात आली, असे विद्यार्थ्यांनी सांगितले. यातून उद्घाटनासाठी आलेल्या मान्यवरांसमोर ‘रंगवलेला चेहरा’ दाखवण्याचा प्रयत्न झाला, मात्र राज्यपालांसह इतर मंत्री कार्यक्रमाला न आल्यामुळे हा खर्चही वाया गेला. वर्षभर वाईट स्थितीतील वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांची समस्या मात्र तशीच कायम आहे. हे विद्यार्थी वसतिगृहाच्या विद्यार्थ्यांना ‘नरक’ म्हणतात, यावरून त्याच्या भयानक स्थितीची कल्पना येऊ शकते.
विधि महाविद्यालय परिसरातील वसतिगृहाच्या सहा इमारती म्हणजे शिक्षणाच्या केंद्राचे कोंडवाडय़ात, किंवा त्याहून वाईट स्थितीत कसे रूपांतर होऊ शकते याचे उदाहरण आहे. येथे सतत घाण वास येत असल्यामुळे विद्यार्थ्यांनी सर्व दारे आणि खिडक्या बंद ठेवल्या आहेत. या परिसरात सर्वत्र कचरा आणि घाण पसरलेली दिसून येते. सुमारे ५० वर्षे जुनी असलेल्या या इमारतीची देखभाल आणि दुरुस्ती होत नसल्याने येथे जणु शरणार्थी राहात असल्यासारखे वाटते. कुणी या इमारतीत येऊन पाहिले तरी याची खात्री पटेल, असे विद्यार्थ्यांनी सांगितले.
वसतिगृहाच्या भिंती थुंकीने भरल्या असून, फरशा कित्येक वर्षांपासून स्वच्छ न झाल्याने येथे गुटखा आणि सिगारेटच्या पाकिटांसह कचऱ्याचे ढीग साचले आहेत. खोल्यांमध्येही जाळे-जळमटांचे साम्राज्य झाल्याने ते डास आणि इतर कीटकांचे आश्रयस्थान ठरले आहे. अशा अनारोग्यदायी वातावरणामुळे अनेक विद्यार्थ्यांना काविळीसारखे रोग आणि त्वचारोग झालेले असल्याचा दावा विद्यार्थ्यांनी केला.
संपूर्ण वसतिगृहालाच संरक्षक भिंत नसल्यामुळे जनावरेही या परिसरात सर्रास फिरत असतात. शिवाय विद्यापीठाचे विद्यार्थी नसलेले बाहेरचे लोकही अवैधपणे वसतिगृहात राहतात आणि येथील विद्यार्थ्यांनाच धमकावतात. परंतु या समस्येला आळा घालण्यात वसतिगृहाचे प्रशासन अपयशी असल्याची विद्यार्थ्यांची तक्रार आहे.
निधीची चणचण असल्याचे कारण सांगणाऱ्या विद्यापीठ प्रशासनाने वसतिगृहांची ही दयनीय स्थिती सुधारण्याचे प्रयत्न केले नाहीत. याच प्रशासनाने कुलगुरूंसाठी १६ लाखांच्या आलिशान स्कोडा कारसह एकूण ५० लाख रुपयांच्या वाहनांचे ‘बुकिंग’ करून आपले दुटप्पी धोरण सिद्ध केले आहे.
या संदर्भात विद्यापीठाच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांशी संपर्क होऊ शकला नाही.

Story img Loader