पिढय़ान्पिढय़ा महाराष्ट्रातील रहिवासी असलेल्या डोंबिवलीतील अपूर्वा पांडे या विद्यार्थिनीला तिच्या पांडे या आडनावावरून उत्तर प्रदेशातील रहिवासी ठरविण्याचा प्रताप डोंबिवलीतील महसूल विभागाच्या सेतू कार्यालयाने केला आहे. स्वातंत्र्यपूवरेत्तर काळापासून महाराष्ट्रात आणि त्यानंतर डोंबिवलीकर असणारे पांडे कुटुंबीय वर्षांनुवर्षे ‘मराठी बाणा’ जपत आले आहेत. आडनाव उत्तर भारतीय भासत असले तरी आम्ही मराठी आहोत, हे मोठय़ा अभिमानाने सांगणाऱ्या पांडे कुटुंबीयांना सेतू कार्यालयाने थेट ‘भैय्या’ ठरविले आहे. फार्मसी अभ्यासक्रमासाठी अपूर्वाला प्रवेश घेण्यासाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांमध्ये या विद्यार्थिनीकडून ती उत्तर प्रदेशातून महाराष्ट्रात कायमची स्थलांतरित झाल्याचे प्रतिज्ञापत्र भरून घेण्यात आले आहे. त्यामुळे पांडे कुटुंबीय कमालीचे अस्वस्थ झाले आहेत.
अपूर्वा पांडे ही मुलुंडच्या वझे-केळकर महाविद्यालयाची विद्यार्थिनी आहे. ती बारावीत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाली. तिला औषधनिर्माण शास्त्र अभ्यासक्रमासाठी प्रवेश घ्यायचा आहे. अपूर्वाने अभ्यासक्रम प्रवेशासाठीची सर्व कागदपत्रे जमा केली. तिचे आडनाव पांडे असल्याने डोंबिवलीतील सेतू कार्यालयातील महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तिच्याकडून ती उत्तर भारतातून महाराष्ट्रात राहावयास आल्याचे प्रतिज्ञापत्र भरून घेतले आहे. याविषयी अपूर्वाने सांगितले, माझा जन्म डोंबिवलीचा आहे. माझे शिक्षण डोंबिवलीत झाले आहे. माझे पणजोबा कृष्णा पांडे हे कापूसतळणी (ता. दर्यापूर, जि. अमरावती) येथील रहिवासी आणि ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक होते. शासनाचे त्यांच्याकडे मानपत्र होते. आजोबा लक्ष्मण (दादा) पांडे हे १९५२पासून डोंबिवलीत वास्तव्यास आहेत. महाराष्ट्रातील वास्तव्याची सर्व कागदपत्रे माझ्याजवळ असताना केवळ पांडे आडनावावरून माझ्याकडून परप्रांतीय असल्याचे भरून घेतलेले प्रतिज्ञापत्र अन्यायकारक आहे. शिधावाटप दुकानात पांडे आडनाव असलेल्या कुटुंबांना तेथील दलाल कसे पटकन शिधापत्रिका मिळवून देतात. ते शासनाला चालते का? असा सवालही अपूर्वाने उपस्थित केला. दरम्यान, यासंबंधी कल्याणचे तहसीलदार शेखर घाडगे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या प्रक्रियेचे समर्थने केले. मुलगी जर अल्पवयीन असेल तर अधिवास दाखला घेण्यासाठी मुलांच्या वडिलांचे किंवा कुटुंबातील अन्य व्यक्तींचे जन्मदाखला प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. तसे नसेल तर अशा प्रकारचे प्रतिज्ञापत्र भरून घेण्यात येते, असे घाडगे यांनी स्पष्ट केले. मुलीचा जन्म स्थानिक असला तरी पूर्वजांचे निवासस्थान कुठे आहे, हे कळण्यासाठी विद्यार्थ्यांकडे वडिलांची किंवा कुटुंबातील अन्य व्यक्तींचा जन्मदाखला प्रमाणपत्र मागण्यात येते. त्यातूनच हा प्रकार घडला असावा, असे घाडगे यांनी स्पष्ट केले. दरम्यान, अपूर्वाचे वडील मनोज पांडे यांनी मात्र प्रक्रियेविषयी नाराजी व्यक्त केली. तसेच माझ्याजवळ जन्मदाखला नाही. परंतु तो मी महापालिकेच्या कार्यालयातून उपलब्ध करून घेणार आहे, असे सांगितले. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा