परदेशस्थ थेट गुंतवणूक देशाच्या विकासाला हातभार लावणारी असली तरी तेवढय़ाने भागणार नाही. वीज, रस्ते यासाठी पायाभूत सुविधा सरकारने उपलब्ध करुन दिल्या, तरच देशाचा खऱ्या अर्थाने विकास होईल, असे प्रतिपादन अर्थतज्ञ डॉ. विनायक गोविलकर यांनी केले.
लोणी (ता. राहाता) येथे पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील राज्यस्तरीय आंतर महाविद्यालयीन रौप्य करंडक वाद-विवाद स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी डॉ. गोविलकर बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी केंद्रिय मंत्री बाळासाहेब विखे होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संपतराव वाळुंज, प्रा. नंदकिशोर बोधाई, डॉ. आर. जे. रसाळ, डॉ. जयसिंग भोर, के. पी. आहेर आदी यावेळी उपस्थित होते.
विदेशी गुंतवणुकीची खरंच गरज आहे काय; असा प्रश्न उपस्थित करुन, डॉ. गोविलकर म्हणाले की, कंपन्यांच्या शेअर्स्, बॉण्ड यांत केलेली गुंतवणूक व उद्योग-व्यापारात केलेली गुंतवणूक म्हणजे थेट गुंतवणूक. त्यामुळे देशाचा विकास करायचा असेल, तर थेट गुंतवणूक चांगली की अन्य मार्गाने केलेली गुंतवणूक चांगली याचा अभ्यास करणे गरजेचे आहे. प्रामुख्याने सेवा क्षेत्रात ही गुंतवणूक होणार आहे. सरकारने त्यासाठी किरकोळ क्षेत्र निवडले आहे.
एफडीआय म्हणजे फक्त शब्दांचाच खेळ आहे असे सांगून गोविलकर म्हणाले, केंद्र सरकार वेळोवेळी आपले धोरण बदलत असल्याने अपेक्षित फायदे मिळण्यास मदत होते. एफडीआयमुळे रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहे, हे दाखविणे गरजेच आहे. यामुळे उलट स्वयंरोजगार जाण्याची भीती निर्माण झाली आहे. जाणाऱ्या रोजगाराविषयी कोणीच बोलत नाही. माहिती-तंत्रज्ञानामुळे विचारांची देवाणघेवाण सुखद झाली आहे. तरुणांनी देशापुढील ज्वलंत समस्यांचा विचार करुन घडणाऱ्या प्रत्येक घटनांचा आपल्यावर काय परिणाम होतो हे बघितले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
ज्येष्ठ नेते बाळासाहेब विखे म्हणाले, एफडीआयवर नियंत्रण ठेवण्यासाठी अजून कायदे तयार झालेले नाहीत. आपण आपली पाठ थोपटल्यासारखी आहे. आíथक सुधारणांवर अचूक भाष्य होणे गरजेचे आहे. आपल्याकडे आयात वाढून निर्यात क्षमता घटत आहे. राज्याचे व केंद्राचे अधिकार कोणते याचा फरक शोधणे महत्वाचे आहे. आर्थिक सुधारणांमुळे एक सुवर्णमध्य साधला पाहिजे. गरीब राष्ट्रांनी स्वत:ची अर्थव्यवस्था निर्माण केली पाहिजे. भारतातल्या अर्थव्यवस्थेचे काही चांगले पैलू स्विकारले तरच आपण आपले सामाजिक जीवन उंचवू शकतो. मॉल संस्कृतीमुळे रस्त्यावरील भाजीविक्रेते नामशेष होत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.   

Story img Loader