महाराष्ट्रातील सर्वाधिक मोठी ग्रामपंचायत म्हणून प्रसिध्द असलेल्या येथील ग्रामपंचायतीने पुढील आर्थिक वर्षांपासून घरपट्टी, पाणीपट्टीत करवाढ करण्याचा निर्णय घेतल्यावर ग्रामपंचायतीकडे तब्बल १११ अकरा हरकती दाखल करणाऱ्यांपैकी सुनावणीसाठी बुधवारी केवळ चारच जण उपस्थित राहिले.
निफाड पंचायत समितीचे ग्रामपंचायत विभाग विस्तार अधिकारी डी. एन. जगताप, सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता पी. ए. पाटील, लघु पाटबंधारे विभागाचे शाखा अभिंयंता डी. एस. साळुंके, सरपंच महेंद्र गांगुर्डे, ज्येष्ठ सदस्य भास्कर बनकर, ग्रामविकास अधिकारी एल. जी. जंगम यांच्या उपस्थितीत सुनावणीसाठी आलेल्या चार जणांशी प्रस्तावित करवाढीबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी जंगम यांनी प्रस्तावित करवाढ ही शासनाच्या नियमाप्रमाणे व कायद्यानुसारच करण्यात येणार असल्याचे सांगितले. चेतन घोडके, संदीप झुटे व शामराव मोरे यांनी करवाढीस लेखी विरोध नोंदविला. तर दिलीप घोडके यांनी चर्चेनंतर करवाढीस हरकत नसल्याचे मान्य केले. ग्
ा्रामपंचायत प्रशासनाने पाण्याचा अपव्यय होऊ नये याबाबत दक्षता घेण्याची सूचना मांडली. यावेळी ग्रामपंचायत सदस्य गणेश बनकर, गफ्फार शेख, किरण लभडे, विष्णूपंत गांगुर्डे आदी उपस्थित होते.
दरम्यान २००२ पासून ग्रामपंचायतीने घरपट्टी, पाणीपट्टी किंवा कोणतीही करवाढ केलेली नाही. मात्र शासन धोरण व नियमानुसार दर चार वर्षांनी करवाढ करण्याचा अध्यादेश आहे.
त्यानुसारच प्रस्तावित करवाढ होईल, असे सरपंच महेंद्र गांगुर्डे यांनी नजरेस आणून दिले. तर, शहरातील सुमारे १५ कोटी रुपयांची विस्तापित पाणी पुरवठा योजना शासनाने मंजूर केली असून या योजनेचे काम अंतिम टप्प्यात असल्याची माहिती ग्रामपंचायतीचे ज्येष्ठ सदस्य भास्कर बनकर यांनी दिली.

Story img Loader