स्पर्धा दुसऱ्यांशी न करता स्वत:शीच करण्यासह आपल्या अंगी असलेल्या गुणांचा, कलेचा, क्षमतांचा विकास करण्याचा सल्ला माजी प्रशासकीय अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांनी दिला. केवळ कागदावरचे गुण म्हणजे बुद्धिमत्ता हा समज काढून टाकावा. आपल्याला ज्यामध्ये आनंद वाटतो तेच क्षेत्र करिअरसाठी निवडावे, असेही त्यांनी सांगितले.
येथील आबासाहेब थोरात तथा ना. म. सोनवणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या वतीने आयोजित स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबीरात धर्माधिकारी बोलत होते. स्वत:ला स्पर्धा परीक्षांसाठी घडविणे म्हणजेच स्वत:चे जीवन घडविणे. हेच व्यक्तीमत्व विकासाचे मर्म असल्याचे त्यांनी नमूद केले. शिक्षणाचा मूळ पाया भक्कम करा. वृत्तपत्रे तसेच स्पर्धा परीक्षा नियतकालिके यांचे सखोल व नियमित वाचन करा. ज्या विषयाचे शिक्षण घेत आहात त्यावर प्रभूत्व मिळवा. म्हणजे स्पर्धा परीक्षेत यश मिळाल्याशिवाय राहणार नाही. करिअर घडविण्यासाठी चार गोष्टी महत्वाच्या आहेत. स्वाध्यायाची कौशल्ये शिकून घेणे, व्यक्तीमत्वात कला किंवा क्रीडा क्षेत्रात निपुणता आणणे, नियमितपणे प्राणायाम, सूर्यनमस्कार वा विपश्यना, ध्यानधारणा करणे, समाजाच्या प्रश्नावर डोळसपणे विचार करून कृती करणे, या गोष्टींचा अवलंब केल्यास स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होण्यास मदत होईल. जनसामान्यांची सेवा हीच ईश्वरसेवा मानली पाहिजे.
आरत्या-पंचारत्या ओवाळून, पूजा-अभिषेक करून भक्तीचे प्रदर्शन न करता प्रशासकीय सेवेतील आपले काम निर्भिडपणे, प्रामाणिकपणे व पारदर्शकपणे केल्यास ईश्वर सेवा होईल. प्रशासक हे जनतेचे मित्र असल्याची भावना लोकांमध्ये निर्माण होण्याची गरज आहे, असे मत धर्माधिकारी यांनी व्यक्त केले.
या प्रसंगी प्राचार्य डॉ. दिलीप शिंदे यांनी प्रास्तविकात महाविद्यालयाच्या प्रगतीचा आढावा घेतला. प्रशांत अमृतकर हा विद्यार्थी पोलीस उप अधीक्षक झाल्याबद्दल त्याचा सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी मराठा विद्या प्रसारक समाजाचे उपसभापती नानाजी दळवी होते. या प्रसंगी भरत कापडणीस, रामचंद्रबापू पाटील, प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. के. एस. पाटील यांनी केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा