सहा लाखाहून अधिक प्रवाशांनी गजबजलेल्या ठाणे स्थानकातील स्वच्छतागृहांचे वास्तव वर्ष सरले तरी भयाण असेच आहे. दहा फलाटांच्या या स्थानकामध्ये केवळ तीन स्वच्छतागृह आहेत. शिवाय ही स्वच्छतागृह देखील अस्वच्छ असल्याने प्रवाशांच्या आरोग्याचा खेळ रेल्वे प्रशासनाने मांडला आहे. लांब पल्ल्याच्या गाडय़ा धावणाऱ्या फलाटांवर स्वच्छतागृह नाही. प्रवाशांच्या रोषानंतर रेल्वेने ‘सुपर डिलक्स स्वच्छतागृहाची’ घोषणा केली. ठाणे स्थानकात हे स्वच्छतागृह बांधले जाईल, अशा बोलगप्पाही मारल्या गेल्या. प्रत्यक्षात गेल्या वर्षभरामध्ये या स्वच्छतागृहाची एक विट देखील रचली गेली नसल्याने प्रवाशांनी रोष व्यक्त केला आहे.
मध्य रेल्वे मार्गावरील गर्दीचे स्थानक म्हणून ठाणे रेल्वे स्थानकाकडे पाहीले जाते. रेल्वे प्रवाशांच्या संख्येत वाढ होत गेली त्या प्रमाणे लोकल गाडय़ा, फलाट आणि उपहारगृहांच्या संख्येत वाढ होत गेली. इतर सुविधा वाढत गेल्या माज्ञ स्वच्छतागृह काही वाढली नाहीत. ठाणे स्थानकामध्ये दहा वर्षांपूर्वी जेवढी स्वच्छतागृह होती तेवढीच आज देखील आहे. त्यांची स्थिती दिवसेंदिवस विदारक बनल चालली आहे. या स्थानकात फलाट क्रमांक दोन येथे कल्याणकडील दिशेला एक स्वच्छतागृह आहे. तर त्याच फलाटाच्या सीएसटीच्या दिशेकडे दुसरे स्वच्छतागृह आहे. ठाणे स्थानकात मध्य रेल्वेचे प्रवासी सात फलाट वापरतात. त्यांना स्वच्छतागृहाच्या वापरासाठी दोन नंबरच्या फलाटांवर येण्याशिवाय गत्यंतर राहत नाही. तर ठाणे- पनवेलच्या प्रवाशांना फलाट क्रमांक दहा वरील स्वच्छतागृहा शिवाय दुसरा पर्यायच नाही. या प्रश्नांवर रेल्वे प्रवाशांनी वारंवार रेल्वेप्रशासन, लोकप्रतिनिधींना धारेवर धरले होते.
सुपर डिलक्सच्या मोठय़ा बाता
प्रवाशांच्या टिकेचे धनी झालेल्या रेल्वे प्रशासनाने वर्षभरापुर्वी ठाणे स्थानकात ‘सुपर डिलक्स टॉयलेट’ ची घोषणा केली होती. बीओटी तत्वावर ठाण्यात अत्याधुनिक टॉयलेट होणार अशी जाहिरातबाजी देखील झाली. ठेकेदाराला जागा हस्तांतरीत करण्यात आली. खासदारांच्या हस्ते भूमीपूजन देखील झाले, ठेकेदाराच्या नावाचा बोर्ड स्टेशन परिसरात झळकला. अन्य बीओटी प्रकल्पांप्रमाणे हा प्रकल्प देखील सुमारे दहा महिन्यांहून अधिक काळ रखडला असून तो प्रकल्प आता रेल्वे प्रशासनाला देखील डोईजड होऊन बसला आहे.
नवे टॉयलेट रखडले, जुने सुधारू..
ठाण्यात ‘सुपर डिलक्स टॉयलेट’ हा रेल्वेचा पहिला प्रयत्न होता, त्याला होत असलेल्या तांत्रिक दिरंगाईमुळे ठाण्यातील नवे स्वच्छतागृह रखडले आहे. परंतु रेल्वे प्रशासन जुने स्वच्छतागृह सुधारण्यासाठी प्रयत्न करत असून त्याचा प्रवाशांना फायदा होईल, असे मत मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी अतुल राणे यांनी वृत्तान्तला सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा