पावसाची संततधार सुरू असतानाही ४८ तासांत खड्डे बुजवा, असे आदेश देत आपल्या बोलघेवडय़ा वृत्तीचे दर्शन घडविणारे ठाण्याचे महापौर हरिश्चंद्र पाटील यांचे आदेश महापालिका प्रशासनाने अक्षरश धाब्यावर बसविल्याचे चित्र अगदी ठसठशीतपणे पुढे येऊ लागले आहे. कोपरी, वागळे इस्टेट, वर्तकनगर, घोडबंदर, कळवा, मुंब्रा अशा शहरातील सर्वच भागांतील प्रमुख रस्त्यांची यंदाच्या पावसाळ्यात दरवर्षीप्रमाणे चाळण झाली असून महापौरांच्या आदेशानंतरही खड्डे कायम असल्यामुळे ४८ तासांच्या मुदतीचे काय झाले, असा सवाल ठाणेकर उपस्थित करू लागले आहेत. निवडणुकीचा हंगाम सुरू होताच बाळासाहेबांचे, दिघेसाहेबांचे ठाणे अशी भावनिक गर्जना करत ठाणेकरांना भुरळ पाडणारे येथील सत्ताधारी शिवसेनेचे नेते ‘खड्डय़ांचे ठाणे’ ही शहराची दरवर्षी निर्माण होणारी ओळख पुसण्यासाठी नेमके काय करतात, असा प्रश्न येथील रहिवाशांना पडू लागला आहे.
पावसाळा सुरू होताच रस्त्यांना खड्डे पडतात हे जवळपास सर्वच शहरांमधील नागरिकांचे प्राक्तन बनले आहे. असे असले तरी कोटय़वधी रुपयांचा खर्च करूनही मुंबई, ठाण्यासारख्या शहरातील रस्त्यांची दरवर्षी होणारी चाळण येथील नागरिकांच्या संतापात भर पाडू लागली आहे. ठाणे शहरातील प्रमुख नाक्यांवरील रस्ते खड्डेमय झाल्यामुळे खडबडून जागे झालेले शहराचे महापौर हरिश्चंद्र पाटील यांनी मंगळवारी ४८ तासांत रस्ते बुजवा, असा वरवर लोकप्रिय वाटणारा आदेश के.डी.लाला यांच्या नेतृत्वाखालील अभियंता विभागाला देऊ केला. सतत कोसळणारा पाउस, वाहतुकीची कोंडी यामुळे ४८ तासांत हे काम शक्य नाही हे महापालिकेतील साध्या शिपायालाही ठाऊक होते. असे असतानाही महापौर आदेश देऊन मोकळे झाले. प्रत्यक्षात ४८ तासांनंतरही शहरातील जवळपास सर्वच भागातील रस्त्यांवरील खड्डे कायम असून वर्तकनगरसारख्या प्रमुख चौकातील रस्त्यांची तर अक्षरश चाळण झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. वागळे भागातील कामगार रुग्णालयालगतचा चौक, कोपरी परिसर, राम मारुती मार्गालगत असलेल्या डांबरी रस्त्याचे बोळ, दगडी शाळेचा परिसर, तीन पेट्रोल पंप, घोडबंदर मार्गास लागून असलेले लहान रस्ते खड्डेमय बनले असून ते बुजविण्यासाठी ४८ तासांत फारसे कष्ट घेण्यात आलेले नाहीत हे चित्र अगदी स्पष्टपणे दिसत आहे. आर. ए. राजीव यांच्या आयुक्तपदाच्या कार्यकाळात सुमारे २४० कोटी रुपयांचा खर्च करून तयार करण्यात आलेल्या नव्या कोऱ्या रस्त्यांनाही अनेक ठिकाणी खड्डे पडले असून महापालिकेचे शहर अभियंता के. डी. लाला त्यावर मूग गिळून असल्याचे चित्र आहे. ठाणे महापालिकेत वर्षांनुवर्षे सत्तेवर असलेले शिवसेनेचे नगरसेवक याविषयी नागरिकांच्या टीकेचे धनी ठरू लागले आहेत. बाळासाहेबांच्या ठाण्याचे खड्डय़ांच्या ठाण्यात झालेले रूपांतर येथील शिवसेना नेत्यांसाठी अवघड जागेचे दुखणे ठरू लागले असून टक्केवारीच्या राजकारणात नवे कोरे रस्ते वाहून गेल्याची टीका आता नागरिक उघडपणे करू लागले आहेत. यासंबंधी महापालिकेतील शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक आणि सभागृह नेते नरेश म्हस्के यांच्याशी संपर्क साधला असता खड्डय़ांविषयी पाच मिनिटांत बोलतो, असे सांगून त्यांनी दूरध्वनी बंद केला. पाच मिनिटांनंतर वारंवार संपर्क साधूनही ते प्रतिक्रियेसाठी उपलब्ध होऊ शकले नाहीत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा