रहिवाशांच्या अनास्थेमुळे नेमका आकडा गुलदस्त्यात
सिडकोने बांधलेल्या बहुतांश इमारती धोकादायक अवस्थेत उभ्या असल्याची ओरड करीत या इमारतींच्या पुनर्बाधणीसाठी राज्य सरकारने अडीच चटईक्षेत्र निर्देशांक मंजूर करावा यासाठी नवी मुंबईतील राजकीय वर्तुळात एकीकडे मोर्चेबांधणी सुरू असली तरी इमारती धोकादायक ठरविण्याच्या प्रक्रियेविषयी खुद्द रहिवाशांमध्येच कमालीची अनास्था असल्याचे चित्र पुढे येऊ लागले आहेत. एखादी इमारत धोकादायक आहे किंवा नाही ते पाहण्यासाठी महापालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली सिडको, सार्वजनिक बांधकाम विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची एक समिती कार्यरत आहे. या समितीने गेल्या वर्षभरात अवघ्या दहा इमारती धोकादायक असल्याचा अहवाल दिला असून सिडको वसाहतींमधील इमारतींचे संरचनात्मक परीक्षण करण्याचे सोपस्कारही रहिवाशांकडून उरकले जात नसल्याचे चित्र पुढे येऊ लागले आहे. विशेष म्हणजे, २.५ चटईक्षेत्र जाहीर होताच तुमच्या इमारतीची पुनर्बाधणी सुरू होणार, अशी आश्वासने देत ठरावीक राजकीय नेते आणि बिल्डर रहिवाशांना दिवास्वप्ने दाखवित असले तरी इमारत धोकादायक ठरविण्याच्या प्रक्रियेविषयी मात्र रहिवाशांना अंधारात ठेवले जात असल्यामुळे वाढीव एफएसआय मिळाला तरी पुनर्विकास प्रक्रियेत मोठे अडथळे निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नवी मुंबईत सिडकोने बांधलेल्या आणि पुढे धोकादायक ठरलेल्या इमारतींच्या पुनर्बाधणीसाठी २.५ चटई निर्देशांक लागू करण्याचा प्रस्ताव सध्या सरकारदरबारी प्रलंबित आहे. राज्य सरकारच्या वेगवेगळ्या विभागांनी या प्रस्तावात सुधारणा करण्याची प्रक्रिया पूर्ण केल्याने सध्या तो नगरविकास विभागाच्या अंतिम मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. नवी मुंबईतील नियोजन प्राधिकरण म्हणून महापालिकेने तयार केलेल्या मूळ प्रस्तावात पुनर्बाधणी कायदा लागू होण्यासाठी संबंधित इमारत धोकादायक असणे बंधनकारक आहे.
धडधाकट इमारतीही धोकादायक?
पुनर्बाधणी प्रकल्पांमध्ये समावेश करून घेण्यासाठी काही धडधाकट आणि दुरुस्तीलायक असलेल्या इमारतीही धोकादायक ठरविण्यासाठी शहरातील काही बिल्डर राजकीय नेत्यांना हाताशी धरू लागल्याची चर्चा रंगली आहे. वाशी सेक्टर १६ येथील अग्निशमन केंद्रास लागूनच असलेली सी-टाइप संवर्गात मोडणाऱ्या सहा इमारती अशाच पद्धतीने धोकादायक ठरविण्यात आल्या असल्या तरी त्यामध्ये राहणाऱ्या काही रहिवाशांनीच या प्रक्रियेला आव्हान उभे केले आहे. त्यामुळे इमारत धोकादायक ठरविण्यासाठी नेमण्यात आलेली समिती यासंबंधीचे निकष कशाप्रकारे पार पाडते, याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. नवी मुंबईत सिडकोने बांधलेल्या बहुतांश इमारती या धोकादायक सदरात मोडतात, असा युक्तिवाद एकीकडे केला जात असला तरी महापालिकेकडे मात्र अतिशय तुरळक प्रमाणात यासंबंधीचे अर्ज येत आहेत, अशी माहिती वरिष्ठ प्रशासकीय सूत्रांनी वृत्तान्तला दिली. या समितीने नुकतीच वाशी सेक्टर नऊ येथील शांतिकुंज वसाहतीमधील दहा इमारती धोकादायक जाहीर केल्या आहेत.
रहिवाशांनी घ्यावयाची काळजी
पुनर्बाधणी प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी संबंधित इमारत शास्त्रीयदृष्टय़ा धोकादायक जाहीर होणे आवश्यक असते. त्यामुळे ३० वर्षांपेक्षा अधिक वयोमान असलेल्या इमारतींमधील रहिवाशांनी आपल्या इमारतींचे संरचनात्मक परीक्षण करून घेणे आवश्यक आहे. महापालिकेकडे नोंदीत असलेल्या संरचनात्मक अभियंत्यांमार्फत इमारतींच्या बांधकामाचा शास्त्रीय अहवाल महापालिकेकडे सादर करावा लागतो. त्यानंतर या अहवालाची सातत्याने आयआयटीमार्फत तपासून घेण्याची तरतूद नगररचना विभागाने केली आहे. आयआयटी तज्ज्ञांच्या अहवालानंतर महापालिकेने नेमलेल्या समितीमार्फत इमारत धोकादायक आहे किंवा नाही ते जाहीर केले जाईल. ही प्रक्रिया पूर्ण केल्याशिवाय इमारतींची पुनर्बाधणी शक्य होणार नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली.