राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाशी संलग्नित बी.एड्. महाविद्यालयांपैकी केवळ दोनच महाविद्यालयांमध्ये नियमित प्राचार्य आणि सहाय्यक प्राध्यापक असून बाकी महाविद्यालयांमध्ये शिक्षक व प्राचार्याचा तुटवडा कायम आहे. आश्चर्य म्हणजे ज्यांची बी.एड्. व एम.एड्.ची महाविद्यालये आहेत त्यांचा विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणांवर वरचष्मा आहे. बी.एड्. किंवा एम.एड्.संबंधीचे प्रश्न विधिसभेत येऊ द्यायचे नाहीत, आले तर ते पुढे कसे ढकलायचे किंवा प्रश्न चर्चेला आला तर निर्णय कार्यवृत्तातून कसे वगळायचे यासाठी राजकारण खेळले जाते.
भंडाऱ्याच्या शासकीय शिक्षण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पं.म. मोहितकर यांनी लागोपाठ अनेक विधिसभांमध्ये बी.एड्.संबंधीचा प्रश्न हाताळण्याचा प्रयत्न केला आहे. विद्यापीठस्तरावर गाजत असलेल्या २५० महाविद्यालयांवरील विद्यापीठ कारवाईला पुरक ठरणारा बी.एड्. महाविद्यालयाचा प्रश्न आहे. कारण त्याठिकाणी शिक्षक व प्राचार्याची वाणवा आहे. मात्र, विविध प्राधिकरणांवर असलेल्या संलग्नित महाविद्यालयाच्या व्यवस्थापनांचे प्रतिनिधी याला रितसर बगल देतात.
विद्यापीठाच्या एकूण ८९ बी.एड्. महाविद्यालयांपैकी भंडाऱ्याचे शासकीय शिक्षणशास्त्र महाविद्यालय आणि गोंदियाचे पुंजाभाई पटेल शिक्षण महाविद्यालय या दोनच महाविद्यालयांमध्ये नियमित प्राचार्य आणि सहाय्यक प्राध्यापक असल्याची माहिती आहे. एनसीटीईच्या नियमानुसार महाविद्यालयांमध्ये प्राचार्य, प्राध्यापक, प्रपाठक आणि अधिव्याख्यात्यांची पदे निश्चित करण्यात आली आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे प्रवेशबंदी करण्यात आलेल्या शेकडो महाविद्यालयांवर कारवाईचा बडगा उगारूनही बी.एड्. आणि एम.एड्.च्या संलग्नित महाविद्यालयांमधील शेकडो शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत. विद्यापीठाच्या कोणत्याही कारवाईला महाविद्यालय व्यवस्थापन भीक घालत नसल्याचेच हे द्योतक आहे. विद्यापीठाशी संलग्नित ८९ महाविद्यालये आहेत. त्यापैकी १५ महाविद्यालयांमध्ये प्राचार्य आणि प्राध्यापक नावालाही नाहीत. एक शिक्षक असलेले १९ महाविद्यालये आहेत. तसेच या ८९पैकी २४ महाविद्यालयांमध्ये ५० टक्क्यांपेक्षा कमी प्रवेश झाले आहेत.
या संदर्भात डॉ. पं.म. मोहितकर म्हणाले, १०० विद्यार्थ्यांच्यामागे एक प्राचार्य आणि १४ विद्यार्थ्यांच्या मागे एक शिक्षक असे गुणोत्तर ठरवण्यात आले आहे. मात्र, दिवसेंदिवस बी.एड्.चे बाजारीकरण होत आहे. शिक्षकांना नेमले जात नाही. नेमलेल्यांना पगार दिले जात नाहीत. शिक्षणशास्त्र हा कौशल्यप्रधान अभ्यासक्रम आहे. यासंबंधीचे शास्त्रशुद्ध शिक्षण विद्यार्थ्यांना मिळत नाही. विद्यापीठ कायद्याच्या कलम ९०(१) नुसार या महाविद्यालयांची विशेष तपासणी व्हायला हवी.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा