महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळामार्फत नियतकालिकांच्या प्रकाशनासाठी २६ नियतकालिकांना देण्यात येणाऱ्या अनुदानासाठी विदर्भातील केवळ दोनच नियतकालिकांना स्थान मिळाल्याने मंडळाचा विदर्भाप्रतीचा सापत्न दृष्टिकोन चव्हाटय़ावर आला आहे. सातारा, कोल्हापूर किंवा धुळ्याच्या मोजक्या नियतकालिकांचा अपवाद वगळता सर्व अनुदान मुंबई-पुण्यामध्ये केंद्रित झाले आहे. विविध विषयांना, आदर्शाना तसेच चळवळींना वाहून घेतलेल्या अनेक नियतकालिकांना मंडळामार्फत सहाय्यक अनुदान दरवर्षी दिले जाते. मंडळाने २०१२साठी २६ नियतकालिकांची अनुदानासाठी निवड केली आहे. बाकी सर्व अनुदान मुंबई- पुण्याच्या नियतकालिकांकडे वळवण्यात आल्याचे ‘लोकसत्ता’ला प्राप्त झालेल्या माहितीतून उघड झाले आहे.
मुंबईतील ‘भारतीय इतिहास आणि संस्कृती’, ‘मराठी संशोधन पत्रिका’, ‘साहित्य’, ‘नव-अनुष्टुभ’, ‘रुची’, ‘मराठी विज्ञान परिषद पत्रिका’, ‘वास्तव रूपवाणी’, ‘प्रेरक ललकारी’ आणि ‘ब्रेल जागृती’ या नियतकालिकांसह पुण्यातील ‘केल्याने भाषांतर’, ‘समाज प्रबोधन पत्रिका’, ‘भाषा आणि जीवन’, ‘पुरोगामी सत्यशोधक’, ‘हाकारा’ या नियतकालिकांचा अनुदानाच्या यादीत समावेश आहे. याशिवाय कोल्हापूरचे ‘दक्षिण महाराष्ट्र साहित्य पत्रिका’ आणि ‘प्रबोधन प्रकाशन ज्योती’ या दोन नियतकालिकांबरोबरच साताऱ्याचे ‘नवभारत’ व ‘अर्थसंवाद’, रत्नागिरीचे ‘झपूर्झा’, हैदराबादचे ‘पंचधारा’, नाशिकचे ‘ब्रेन टॉनिक’, धुळ्याचे ‘आमची श्रीवाणी’ आणि मिरजचे ‘संगीत कला विहार’ या नियतकालिकांना अनुदानाच्या यादीत स्थान मिळाले आहे. एकूण २६ अनुदानित नियतकालिकांपैकी विदर्भातील अमरावतीच्या सुभाष सावरकर यांच्या ‘अक्षर वैदर्भी’ या मासिकाला आणि नागपुरातील ‘शिक्षण समीक्षा’ या द्वैमासिकावर मेहेरनजर वळली आहे. विदर्भात नियतकालिके नाहीत असे अजिबात नाही. ‘युगवाणी’, ‘आकांक्षा’, अमरावतीतील दामोदर यांचे ‘परामर्श’, रवींद्र इंगळे यांचे ‘शब्दवेध’, रमेश इंगळे उत्रादाकर यांचे ‘ऐवजी’ शेगावच्या दा.गो. काळे यांचे ‘अतिरिक्त’, नागपूरच्या हनुमाननगरातून गेल्या १०० वर्षांपेक्षाही जास्त काळापासून अविरत प्रकाशित होणारे मोडक यांचे ‘मुलांचे मासिक’, दिवाकर मोहनी यांचे ‘आजचा सुधारक’, सुखदेव ढाणके यांचे ‘सर्वधारा’, वाशिमच्या विष्णू जोशी यांचे ‘काव्याग्रह’ आणि बुलढाण्यातील नरेंद्र लांजेवार यांचे ‘आत्मभान’ या सारखी नियतकालिके आजही सुरू आहेत. लोकानुकम्पा, शब्दांकूर किंवा विदर्भ संशोधन मंडळाची नियतकालिके नियमित प्रकाशित होत नाही. ‘निकायत’, ‘समुच्चित’ आदींसारखी नियतकालिके पैशाअभावी बंद पडली. मंडळाने नियमित अनुदानाचा पुरवठा केला असता तर ही नियतकालिके जिवंत राहिली असती. आताही मंडळाने उदारवृत्ती न ठेवता विदर्भातील केवळ दोन नियतकालिकांना जवळ केले तर बाकीच्यांना वाऱ्यावर सोडले.
राज्याच्या पुढील २५ वर्षांतील मराठी भाषेचे धोरण ठरवणे, भाषा अभिवृद्धीसाठी नवनवे उपाय व कार्यक्रम सुचवणे या अनुषंगाने शासनाला मदत करण्यासाठी भाषा संचालनालयांतर्गत कायमस्वरूपी भाषा सल्लागार समिती स्थापन करण्यात आली आहे. न्या. नरेंद्र चपळगावकर यांनी दिलेल्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांची सल्लागार समितीने उद्या, ७ जूनला अमरावतीत तर ८ जूनला नागपुरात बैठक घेणार आहेत. मराठी भाषेचे धोरण ठरवताना मराठीची अस्मिता सदैव जागृत ठेवणाऱ्या वैदर्भीय नियतकालिकांच्या अभिवृद्धीसाठी ही समिती लक्ष पुरवेल, अशी वैदर्भीय साहित्यिकांना आशा आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा