पावसाचे पाणी उपसणाऱ्या जल उदंचन केंद्रांच्या भूमिपूजनाचे कार्यक्रम निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून दणक्यात होत असले तरी या केंद्रांच्या उभारणीची कासवगती पाहता आणखी २-३ वष्रे तरी या केंद्रांचा फायदा मिळण्याची चिन्हे नाहीत. गेल्या आठ वर्षांत आठपकी केवळ दोनच केंद्रे सुरू झाली असून दोन केंद्रे तर अजूनही पर्यावरण खात्याच्या परवानगीच्या जाळ्यात अडकली आहेत.
२६ जुल २००५ च्या महापुरानंतर चितळे समितीने शहरातील सखल भागात साठणारे पाणी उपसून टाकण्यासाठी आठ उदंचन केंद्रे उभारण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर महापालिकेने दोन टप्प्यांत आठ केंद्रे उभारण्याचा प्रकल्प २००६ मध्ये सुरू केला. इर्ला तसेच वरळीची लव्हग्रोव्ह, क्लीव्हलॅण्ड व हाजीअली ही चारही केंद्रे २००८ मध्ये पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र इर्ला आणि हाजीअली ही केंद्रे सुरू होण्यासच चार वष्रे लागली. २०१० च्या पावसाळ्यात या दोन केंद्रांमुळे अंधेरी व हाजीअली परिसरात अनेक रस्त्यांवर पाणी तुंबण्याचा प्रकार कमी झाला. मात्र वरळी येथील लव्हग्रोव्ह व क्लीवलॅण्ड येथील उदंचन केंद्रांचे काम झोपडय़ांचे पुनर्वसन करण्याच्या समस्येमुळे रेंगाळले. ही कामे २०११ च्या मान्सूनपूर्वी पूर्ण होणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात त्यांचे काम २०११ मध्ये सुरू झाले. हे काम २०१३च्या ऑक्टोबरमध्ये पूर्ण करण्याची अट पालिकेने घातली होती. त्यानंतर ही मुदत २०१४ च्या मे-जूनपर्यंत वाढवण्यात आली. पण अजूनही हे काम अर्धवटच आहे. जूनमध्ये पाऊसच आला नसल्याने या अपयशाचा फटका मुंबईकरांना बसलेला नाही. मात्र जुल-ऑगस्टमध्ये पावसाने संततधार धरल्यास वरळी, प्रभादेवी, लोअर परळ, महालक्ष्मी या भागांत पाणी साठण्याचा धोका आहे.
तब्बल आठ वर्षांत दोन उदंचन केंद्रे सुरू केल्यानंतर आता पालिकेने धूमधडाक्यात दोन केंद्रांचे भूमिपूजन केले आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी ब्रिटानिया उदंचन केंद्राचे, तर विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी सोमवारी, ३० जून रोजी जुहू कोळीवाडा येथील गझदरबंद उदंचन केंद्राचे भूमिपूजन दणक्यात करण्यात आले. ही दोन्ही केंद्रे पावसाचे महिने वगळता १८ महिन्यांत पूर्ण करायची आहेत. मात्र आतापर्यंतचा इतिहास पाहता या केंद्रांचा लाभ संबंधित परिसराला होण्यासाठी २०१७ साल उजाडावे लागेल.
अंधेरी येथील मोगरा नाला आणि चेंबूर येथील माहुल परिसरातील केंद्रे तर अजूनही पर्यावरण विभागाच्या परवानगीतच अडकली आहेत. खारफुटी तोडून हे काम करावे लागणार असल्याने दोन्ही केंद्रांना नकार देण्यात आला होता. ‘आता माहूल परिसरातील केंद्राच्या दहा टक्के परिसरातील खारफुटीचे पुनरेपण कुठे करणार त्याबाबत माहिती पुरवल्यास या केंद्राला परवानगी मिळू शकेल. मोगरा नाल्याबाबत मात्र वेगळ्या जागेचा शोध अजूनही सुरू आहे,’ अशी माहिती पालिकेच्या विशेष अभियांत्रिकी व प्रकल्प संचालक लक्ष्मण व्हटकर यांनी दिली.
पर्जन्यजल उदंचन केंद्र पहिला टप्पा
इर्ला उदंचन केंद्र- वर्सोवा, विलेपाल्रे भागातील पूरस्थिती रोखण्यासाठी उपयुक्त.  खर्च ९२ कोटी रुपये. आराखडा २००६ मध्ये. डिसेंबर २००७ मध्ये कामाला सुरुवात, २०१० मध्ये पूर्ण.
हाजीअली- नाना चौक, ताडदेव रोड, पेडर रोड या परिसरांतील काही भाग पाण्याखाली येण्यापासून रोखला. खर्च ९९ कोटी रुपये. डिसेंबर २००७ मध्ये सुरुवात. २०१० मध्ये पूर्ण.
लव्हग्रोव्ह- वरळी, परळ, करी रोड भागांतील पूर रोखण्यासाठी. खर्च १०२ कोटी रुपये. २०११ मध्ये भूमिपूजन. ऑक्टोबर २०१३ मध्ये पूर्ण होणे अपेक्षित. जून २०१४ पर्यंत मुदतवाढ. मात्र काम अपूर्णच. नवीन मुदतवाढ ऑक्टोबर २०१४.
क्लीव्हलॅण्ड- प्रभादेवी, हाजीअली, महालक्ष्मी २०११ मध्ये भूमिपूजन. ११६ कोटी रुपयांचा खर्च. ऑक्टोबर २०१३ मध्ये पूर्ण होणे अपेक्षित. झोपडपट्टी पुनर्वसन समस्या असल्याने मुदत वाढवून मे २०१४ केली. मात्र त्यातही काम पूर्ण झाले नसल्याने पालिकेने २५ लाख रुपयांचा दंड केला. आता नवीन मुदत ऑक्टोबर २०१४.
दुसरा टप्पा
ब्रिटानिका- लालबाग, िहदमाता, भायखळा, रे रोड, खर्च ११५ कोटी रुपये. १८ फेब्रुवारी २०१४ रोजी भूमिपूजन. पावसाळ्याव्यतिरिक्त १८ महिन्यांची मुदत.
गजधरबंद – जुहू कोळीवाडा, दौलत नगर, शास्त्री नगर, पी अॅण्ड टी कॉलनी, लिंकिंग रोड, नवली आग्रीपाडा शाळा व परिसर. १३१ कोटी रुपयांचे कंत्राट. ३० जून २०१४ रोजी भूमिपूजन, पावसाळ्याव्यतिरिक्त १८ महिने काम.
मोगरा नाला, अंधेरी- खारफुटीमुळे पर्यावरण विभागाचा नकार. दुसऱ्या जागेचा शोध अजूनही सुरू.
माहुल खाडी, चेंबूर- केंद्राच्या प्रस्तावित जागेपकी दहा टक्के जागेत खारफुटी. पुनरेपणाचा आराखडा सादर केल्यास परवानगी मिळण्याची शक्यता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा