११९ शिक्षकांच्या वेतन व सेवानिवृत्तीवर ७ कोटींचा खर्च
महानगरपालिकेच्या ४१ प्राथमिक शाळेत केवळ २ हजार २७६ विद्यार्थी शिल्लक राहिले असून या विद्यार्थ्यांना शिकविणाऱ्या ११९ शिक्षकांच्या वेतन व सेवानिवृत्ती वेतनावर तब्बल ७ कोटींचा खर्च होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. गेल्या १५ वर्षांत मनपाच्या १२ शाळा बंद पडल्या असून १२ हजार विद्यार्थी कमी झाले आहेत.
इंग्रजी माध्यमांच्या शाळा व कॉन्व्हेंट संस्कृतीला सुरुवात होताच या जिल्ह्य़ात गल्लीबोळात के.जी.१ पासून तर दहावी व बारावीपर्यंत विद्यार्थ्यांना शिक्षण देणाऱ्या इंग्रजी शाळा व कॉन्व्हेंटस आहेत. या शैक्षणिक स्पध्रेत महानगरपालिका बरीच मागे पडली असून मनपाच्या शाळेत आज केवळ २ हजार २७६ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. १५ वर्षांपूर्वी म्हणजे १९९९ मध्ये चंद्रपूर नगरपालिकेच्या ५३ प्राथमिक शाळांमधून १४ हजार विद्यार्थी शिक्षण घेत होते. तेव्हा खर्च परवडत नाही म्हणून खासगी कॉन्व्हेंटमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी होती.
मनपाच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या चांगली होती, परंतु आज स्थिती अगदी उलट झाली असून महानगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या तब्बल १२ हजाराने कमी झाली आहे. आज मनपाच्या ४१ शाळांमध्ये केवळ २ हजार २७६ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत, तर या विद्यार्थ्यांना शिकविणाऱ्या शिक्षकांची संख्या ११९ आहे. विशेष म्हणजे, या ११९ शिक्षकांच्या वेतनावर महिन्याकाठी ४० लाखाचा व वर्षांकाठी ४ कोटी ८० लाखाचा खर्च होत आहे, तर सेवानिवृत्ती वेतनावर वर्षांकाठी दोन कोटीचा खर्च होत आहे. वेतन व सेवानिवृत्तीवर वर्षांकाठी सात कोटीचा खर्च होत आहे. महानगरपालिकेला शासनाकडून आठ कोटी रुपये यासाठी मिळतात. मात्र, शिक्षकांवरच सर्वाधिक खर्च होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
गेल्या १५ वर्षांत महानगरपालिकेच्या १२ मोठय़ा शाळा बंद पडलेल्या आहेत. यातही बहुतांश शाळांच्या जमिनी बिल्डरांच्या घशात गेल्या असून त्यावर मोठमोठे मॉल्स व इमारती उभ्या राहिल्या आहेत. महानगरपालिकेच्या अगदी मागच्या बाजूला असलेल्या महात्मा गांधी प्राथमिक शाळा या शहरातील सर्वात जुन्या शाळेची अवस्था आज अतिशय वाईट आहे.
या शाळेत आज केवळ १०० विद्यार्थी आहेत. महानगरपालिकेने काही दिवसापूर्वी शाळेची इमारत पाडून तेथे शेतकरी बाजार सुरू करण्याचा ठराव घेतला होता. मनपाच्या आमसभेत तसा निर्णयही झाला, परंतु कोतवाली वॉर्डातील नागरिकांनी स्वाक्षरी अभियान राबवून शाळा पाडू नका, असे आवाहन केले. त्यामुळे तूर्तास तरी शाळेची इमारत जैसे थे उभी आहे. मात्र, ही परिस्थिती बघता या शाळेचे भविष्यही अंधारात दिसत आहे. महानगरपालिकेची केवळ हीच शाळा नाही, तर बहुतांश शाळांची स्थिती अशीच आहे.
महानगरपालिकेच्या एका शाळेत सध्या झोन क्रमांक दोनचे कार्यालय व मनपाची सर्व वाहने ठेवली जात आहेत. विशेष म्हणजे, ही शाळा पाडून तेथेही भव्य व्यापार संकुल उभारण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. कुठल्याही शहराच्या प्रगतीत शिक्षणाचा वाटा महत्त्वपूर्ण असतो. त्यामुळे महानगरपालिकेने स्वत:चे कॉन्व्हेंट व इंग्रजी माध्यमांच्या शाळा सुरू करायला हव्या होत्या, परंतु पदाधिकारी व अधिकाऱ्यांचे नेमके याकडेच दुर्लक्ष झाले.
त्याचा परिणाम मनपाच्या शाळेतील विद्यार्थी संख्या रोडावली व शाळाही बंद पडल्या. येत्या काही वर्षांत शहरात महानगरपालिकेच्या प्राथमिक शाळा दिसणार नाहीत इतकी वाईट अवस्था आहे. मनपाच्या शाळाच राहिल्या नाहीत तर झोपडपट्टीतील व गरीब घरातील होतकरू विद्यार्थ्यांने शिक्षणाचा प्रश्न निर्माण होणार आहे. महानगरपालिकेचे शिक्षणाचे उदासीन धोरण बघता ही वेळ लवकरच येईल, अशी प्रतिक्रिया मनपाच्या एका अधिकाऱ्याने बोलून दाखविली, तर गेल्या १५ वर्षांत ज्या शाळा बंद पडल्या, त्या पूर्ववत सुरू कराव्यात, अशी मागणी काही नगरसेवकांनी केली आहे.

Story img Loader