राजकीय क्षेत्रात निरनिराळे प्रयोग करून विरोधकांना सतत संभ्रमावस्थेत ठेवणाऱ्या आ. अनिल गोटे यांनी आगामी महापालिका निवडणुकीत लोकसंग्राम पक्षातर्फे शहरातील सर्व जागांवर पुरूषांना बाजुला सारत केवळ महिला उमेदवारांनाच संधी देण्याची संकल्पना मांडली आहे. स्थानिक पातळीवरील राजकारणात संभाव्य महिलाराजच्या या घोषणेमुळे सर्वाच्या भुवया उंचावल्या आहेत.
येथील जुन्या अमळनेर थांब्यावर लोकसंग्राम पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा शहराचे आ. गोटे यांनी नुकतीच जाहीर सभा घेतली. त्यावेळी त्यांनी आगामी महापालिका निवडणुकीसाठी पक्षाची भूमिका स्पष्ट केली. साधारणत: नोव्हेंबर २०१३ मध्ये ही निवडणूक होईल. या निवडणुकीत सर्व प्रभागांमध्ये महिला उमेदवार देण्याचे जाहीर करत मोर्चेबांधणीला सुरूवात केली आहे. निवडणूक आयोगाच्या सुचनेनुसार महापालिका प्रशासनाने वॉर्ड रचनेचे काम हाती घेतले असून यावेळी तीन वॉर्ड वाढणार आहेत. यामुळे शहरात एकूण ७० वॉर्ड अस्तित्वात येतील. ३५ प्रभागांच्या रचनेनुसार एका प्रभागात दोन या संख्येने महापालिकेवर एकूण ७० नगरसेवक निवडून येतील. ५० टक्के आरक्षणामुळे ७० पैकी ३५ ठिकाणी महिलाच निवडून येणार असल्याने आणि सर्वसाधारण वॉर्डातूनही लोकसंग्राम पक्ष महिलांनाच उमेदवारी देणार असल्याने या पक्षाच्या ७० महिला उमेदवार रिंगणात असणार आहेत. यामुळे महिला उमेदवाराच्या विरोधात पुरूष उमेदवारांना प्रचार मोहीम राबविणे भाग पडणार असल्याचे दिसत आहे.
सध्या महापालिकेत लोकसंग्रामतर्फे निवडून आलेल्या सातपैकी दोन नगरसेवकांना आ. गोटे यांनी स्वत:च काढून टाकले आहे. उर्वरित पाच सदस्यांमध्येही ताळमेळ राहिला नसल्याचे चित्र आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेत महिलाच निर्णायक भूमिका निभावू शकतील, असा विश्वास आ. गोटे यांनी व्यक्त केला आहे. आ. गोटे यांची आजवरची कार्यशैली पाहता विरोधकांना विविध मार्गाने कात्रजचा घाट दाखविण्यावर त्यांचा भर राहिल्याचे लक्षात येते. महापालिकेत निवडून गेलेले नगरसेवक पक्षाचा ठसा उमटविण्यात अपयशी ठरले. या पाश्र्वभूमीवर, केवळ महिलांना संधी देण्याच्या प्रयोगाद्वारे स्वपक्षीयांबरोबर विरोधकांना शह देण्याचे नियोजन लोकसंग्रामने केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.