उर्वरित पावसाळय़ाचे मुबलक दिवस तसेच संभाव्य पूर आणि महापुराचे संकट टाळण्यासाठी दक्षता म्हणून कोयना धरणाचा पाणीसाठा नियंत्रित करण्यात येत आहे. या पाश्र्वभूमीवर ‘कोयना’ चे सहा वक्र दरवाजे आज सकाळी साडेदहापासून २ फुटांनी उचलून कोयना नदीपात्रात १५,७८८ क्युसेक पाणी सोडण्यात येत आहे. तर, पायथा वीजगृहातून नदीपात्रात २,१११ क्युसेक पाणी मिसळतच आहे. दरम्यान, कोयना धरणात सुमारे २० हजार क्युसेक पाण्याची आवक होत आहे. पावसाचा रात्रीचा जोर तर दिवसाची ओढ अशी तऱ्हा कायम असल्याने धरण व्यवस्थापनाकडून पाणीसाठा नियंत्रित राखत दक्षता घेतली जात आहे.
आज सकाळी ८ वाजेपर्यंत गेल्या २४ तासांत धरणक्षेत्रातील कोयनानगर विभागात २० एकूण ४,६६४, महाबळेश्वर विभागात ४० एकूण ५,००५ तर, नवजा विभागात २० एकूण सर्वाधिक ५,४६६ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. तसेच दिवसभरात धरणक्षेत्रात सरासरी ९.३३ मि.मी. पावसाची नोंद आहे. कोयना जलाशयाची पाणीपातळी २,१५८ फूट ८ इंच तर, पाणीसाठा ९९ टीएमसी म्हणजेच ९४ टक्के आहे. चालू हंगामातील ६५ दिवसांत दररोज सरासरी २ टीएमसीपेक्षा जादा पाण्याची आवक झाली आहे. कोयना धरणात १३२ टीएमसी पाण्याची आवक होताना सुमारे ५५ टीएमसी पाणी दरवाजातून सोडण्यात आले. हे पाणी वापराविना वाया गेले आहे. तर, सुमारे ११ टीएमसी पाणी वीजनिर्मितीसाठी कारणी लागले आहे. कोयना धरणातून हा एकंदर विसर्ग सुमारे ६६ टीएमसी झाला आहे.
गेल्या सव्वादोन महिन्यांतील समाधानकारक व दमदार पाऊस गतवर्षीच्या दीडपट तर आजवरच्या एकंदर सरासरीपेक्षा २५ टक्क्यांवर जादा राहिला आहे. तर, पश्चिम महाराष्ट्रातील सर्वच लहान-मोठे प्रकल्प पावसाळी हंगामाच्या ४५ दिवसांतच भरभरून वाहिले आहेत. अपवाद वगळता सलग ६५ दिवस कोसळलेल्या दमदार पावसामुळे बळिराजासह सर्वसामान्य जनता सुखावल्याचे चित्र आहे. धरणक्षेत्रासह त्याखालील कराड, पाटण तालुक्यातही पावसाची उघडझाप सुरूच असून, श्रावणातील ऊन-पावसाच्या खेळामुळे सर्वत्र समाधानाचे वातावरण आहे. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा