चित्रांचे प्रदर्शन म्हटले की जहांगीरसारखी बंदिस्त कलादालने डोळ्यासमोर उभी राहतात. परंतु अंधेरीत पहिल्यांदाच उद्यानात खुली कला प्रदर्शनी उभी केली जाणार आहे.
१९९१ साली मुंबईचे महापौर छगन भुजबळ यांच्या कार्यकाळात ४५ दिवसात ही कला प्रदर्शनी उभारण्यात आली होती. पण जेवढय़ा जलद गतीने ही उभारण्यात आली तेवढय़ाच जलद गतीने तीची दुरवस्थाही झाली. आणि गेली १८ -२० वर्षे त्याकडे कोणाचेही लक्ष नव्हते. परंतु काही दिवसांपूर्वी स्थानिक नगरसेवकांनी महापालिकेच्या वतीने त्याचे सुशोभिकरण केल्याने या उद्यानाचा चेहरामोहरा बदलला आहे. वेगवेगळी झाडे, व्यासपीठ, आणि बसण्यासाठी गोलाकार बाके बनविण्यात आल्याने एरवी बागेत कधीच न फिरकणाऱ्यांची गर्दी सकाळी संध्याकाळी वाढली आहे.  पण या सगळ्यामध्ये या उद्यानाचा मुख्य ‘कला प्रदर्शनी’चा हेतूच मागे पडला होता. त्यामुळे चित्रकलेसह कलाप्रदर्शने, सांस्कृतिक कार्यक्रम, योगाभ्यास यासारखे उप्रकम राबविता येतील आणि त्यातून महापालिकेलाही महसूल मिळेल ही संकल्पना मांडत स्थानिक नगरसेवक संजय पवार यांनी कला प्रदर्शनीला १ कोटी निधी देण्याची मागणी केली होती. त्यानुसार ही मागणी मान्य करीत महापालिकेने नव्या रूपात याठिकाणी कलाप्रदर्शनी उभारण्यास अनुमती दिली आहे. या नवीन कला प्रदर्शनीचा आराखडा तयार करण्याची प्रक्रियाही सुरू झाली आहे. मुंबईतली ही पहिली खुली कलाप्रदर्शनी लवकरच सुरू होत आहे.

Story img Loader