राज्य शासनाच्या सामाजिक विभागाच्या वतीने बांधण्यात आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय संकुलाचे उद्घाटन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते आणि राज्य मंत्रिमंडळातील बहुतांश मंत्र्यांच्या उपस्थितीत ८ मार्च रोजी होणार आहे, अशी माहिती गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी दिली.
सामाजिक न्याय भवनाची भव्य इमारत कदमवाडी परिसरात उभारण्यात आली आहे. एकाच इमारतीमध्ये दलित आणि मागासवर्गीय घटकांना बहुतांशी शासकीय योजनाचा लाभ घेता यावा, यासाठी पश्चिम महाराष्ट्रातील पहिले न्याय संकुल कोल्हापूर शहरातील कदमवाडी परिसरात उभारले आहे. या भवनामध्ये विभागीय जातपडताळणी, समाजकल्याण आदी शासकीय कार्यालये सुरू करण्यात आली आहेत, परंतु गेल्या वर्षभरापासून या भवनाच्या उद्घाटनाला मुहूर्त मिळत नव्हता.
८ मार्च रोजी सामाजिक न्याय संकुलाच्या उद्घाटनाची तारीख निश्चित करण्यात आली असून, राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटनाचा समारोह आयोजित करण्यात आला आहे. या पाश्र्वभूमीवर गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी न्याय संकुलात जाऊन पाहणी केली आणि उद्घाटनासंदर्भात अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.

Story img Loader