ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प चंद्रपूर व पुनर्रचित चंद्रपूर वनविभाग कार्यालयाचे उद्घाटन प्रधान सचिव प्रवीणसिंग परदेशी यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी मुख्य वनसंरक्षक बी. एस. के. रेड्डी, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक वीरेंद्र तिवारी, जिल्हाधिकारी विजय वाघमारे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी अरुण शिंदे उपस्थित होते.
राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या मार्गदर्शक तत्वानुसार वन्यजीवांच्या प्रभावी संवर्धन व संरक्षणासाठी चंद्रपूर वन विभागाचे बफर व नॉन बफर, असे दोन विभाग करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. त्यानुसार बफर क्षेत्राकरिता उपसंचालक, बफर ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प चंद्रपूर व उर्वरित क्षेत्राकरिता विभागीय वन अधिकारी या दोन विभागांची निर्मिती करण्यात आलेली आहे. याप्रसंगी प्रभावी वन व वन्यजीव संरक्षणासाठी मोहुर्ली, पळसगाव, शिवणी व चिचपल्ली वन परिक्षेत्रांकरिता टाटा सुमो वाहनांचे वाटप प्रधान सचिव परदेशी यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील गावांच्या पुनर्वसनासाठी  स्थापित समितीची बैठक घेण्यात आली. या बैठकीत विविध यंत्रणांचे अधिकारी व मानद वन्यजीव रक्षक बंडू धोत्रे उपस्थित होते.कार्यक्रमाकरिता उपवनसंरक्षक एम. एम. कुळकर्णी, व्ही. बी. ठाकरे, राजू धाबेकर, गिरीश वरिष्ट, कुळसंगे, कोटेवार, बिसेन, बडकेलवार व वनाधिकारी उपस्थित होते.