अकोले तालुक्यातील पट्टा किल्ल्याचा परिसर शिवप्रेमी, दुर्गप्रेमींच्या गर्दीने फुलून गेला होता. िहदवी स्वराज्याचे संस्थापक शिवाजी महाराजांचा जयजयकार सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात घुमत होता. हजारो शिवभक्तांच्या उपस्थितीत महाराजांच्या जयघोषात, वाद्याच्या गजरात, तुतारीच्या निनादात, फटाक्यांच्या आतिषबाजीत ओसंडून वाहणाऱ्या उत्साहाच्या सोबतीने पट्टाकिल्ल्यावर शिवाजी महाराजांच्या अर्धपुतळ्याचे आज अनावरण करण्यात आले.
भारावून टाकणाऱ्या या वातावरणामुळे पट्टा किल्ल्यावर आज जणू इतिहासच जीवंत झाल्याचा भास होत होता. हे दृश्य पाहताना शिवप्रेमी रोमांचित झाले तर गौरवशाली इतिहासाचा वारसा सांगणारे गडकोटांचे भग्न अवशेषही पुलकित झाले. हा चैतन्यदायी सोहळा पाहण्याचे, त्यात सहभागी होण्याचे भाग्य ज्यांना लाभले ते धन्य धन्य झाले.
जालनाच्या मोहिमेनंतर परतत असताना संगमनेरजवळ रायतेवाडी आपल्या आयुष्यातील शेवटची लढाई लढून शिवाजी महाराज २१ नोव्हेंबर १६७९ या दिवशी नगर व नाशिक जिल्ह्याच्या  सरहद्दीवरील अकोले तालुक्याच्या पट्टाकिल्ल्यावर ते आले होते तेथे त्यांचे १७ दिवस वास्तव्य होते. महाराज विश्रांतीसाठी थांबले म्हणुन या किल्ल्याला नंतर विश्रामगड असे नाव पडले. शिवाजी महाराजांच्या  पदस्पर्शाने पुनीत झालेल्या या पट्टाकिल्ल्यावर आज शिवजयंतीच्या मुहर्तावर सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्याहस्ते शिवपुतळ्याचे अनावरण करण्यात आले. गृहमंत्री आर. आर. पाटील, जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव पाचपुते यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष मधुकरराव पिचड होते. युवा नेते वैभव पिचड यांच्या नेतृत्वाखाली मोठय़ासंख्येने
युवकही यावेळी उपस्थित होते. पट्टाकिल्ला पर्यटन विकासकामांचा शुभारंभही यावेळी करण्यात
आला.
अनावरण कार्यक्रमानंतर विश्रामगडाच्या पायथ्याशी जाहीर  सभा झाली. पट्टाकिल्ल्याच्या पर्यटन विकासासाठी सवरेतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही श्री. भुजबळ यांनी यावेळी दिली. तर येथुन पुढे दरवर्षी पोलिस पथक गडावर जाऊन महाराजांना मानवंदना देत जाईल अशी घोषणा गृहमंत्री पाटील यांनी यावेळी केली. या भूमीतील माणसांवर महाराजांचा विश्वास होता म्हणुनच ते वास्तव्यासाठी या गडावर आले होते असे दोघांनीही आवर्जून सांगितले. ‘अकोल्याचे पर्यटन’ या पुस्तिकेचे प्रकाशन यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या सोहळ्याच्या निमित्ताने राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या युवकांनी शिवनेरी येथून पट्टाकिल्ल्यापर्यंत शिवज्योत आणली होती. तुतारीच्या निनादात मान्यवरांच्या हस्ते या ज्योतीचे स्वागत करण्यात आले.
हार, तुरे व सत्काराला कार्यक्रमात पुर्णपणे फ़ाटा देण्यात आला होता. त्यामुळे वाचलेले १ लाख १० हजार रुपये दुष्काळग्रस्तांना मदत म्हणुन मुख्यमंत्री निधीला देण्याची घोषणा पिचड यांनी केली. प्रारंभी परिसरातील शाळांमधील विद्यार्थ्यांनी बहारदार सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. गेली अनेक वर्षे ऐतिहासिकदृष्टय़ा महत्वाच्या असणाऱ्या गडाचा इतिहास फ़ारसा कुणाला माहित नव्हता. आज तो इतिहास जीवंत झाला. अकोले तालुक्याच्या दृष्टीने ऐतिहासिक स्वरुपाचाच हा समारंभ ठरला. शिवाजी महाराजांचे पाय ज्या भूमिला लागले तेथील मातीला वंदन करण्यासाठी शिवप्रेमींनी मोठी गर्दी केली होती.

Story img Loader