डॉ. बाबासाहेब आंबेडकर वैद्यकीय प्रतिष्ठान संचालित श्रीगुरुजी रुग्णालयाच्या नूतन वास्तूचे उद्घाटन शुक्रवारी सायंकाळी साडेसहा वाजता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते तर महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्राचे संचालक अरुण नंदा यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. या रुग्णालयाचे वैशिष्टय़ म्हणजे समाजातील सर्व स्तरांतील नागरिकांना अल्प दरात सर्व प्रकारच्या वैद्यकीय उपचारांची उपलब्धता.
गंगापूर रस्त्यावरील आनंदवल्ली चौकात ८० खाटांचे अत्याधुनिक यंत्रसामग्रीने सुसज्ज अशा या रुग्णालयाची उभारणी करण्यात आली आहे. मध्यवर्ती हिंदू सैनिकी शिक्षण संस्थेने याकरिता दिलेल्या पाच एकर जागेत १२ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून ४० हजार चौरस फुटांचे बांधकाम करण्यात आले आहे. या बाबतची माहिती स्थानिक समितीचे अध्यक्ष डॉ. विनायक गोविलकर यांनी दिली. वैद्यकीय उपचारात अतिव्यावसायिकता आल्याचा अनुभव रुग्णांना अनेक वर्षांपासून येत आहे. योग्य चाचण्या व उपचार व्हावेत, ही प्रत्येकाची इच्छा असते. ‘वाजवी दरात योग्य उपचार’ हे ब्रीद घेऊन या रुग्णालयाची संकल्पना मांडण्यात आली आहे. वाजवी दरात योग्य वैद्यकीय सेवा देण्याच्या धैर्याने प्रेरित झालेले डॉक्टर्स, समाजसेवेचे व्रत घेतलेले समिती सदस्य यांच्या प्रयत्नातून पाच वर्षांपूर्वी श्रीगुरुजी रुग्णालय शहरात सुरू झाले. जागा मिळाल्यानंतर दीड वर्षांच्या कालावधीत रुग्णालयाच्या नवीन वास्तूचे काम पूर्णत्वास नेण्यात आले. या रुग्णालयात कृत्रिम सांधेरोपण शस्त्रक्रिया, लहान मुलांचे अस्थिव्यंग उपचार, कॅन्सर उपचार, आयुर्वेद व पंचकर्म चिकित्सा, वंध्यत्व निवारण, मेंदूच्या शस्त्रक्रिया, मूत्ररोग उपचार या विशेष सेवा व उपचारांची उपलब्धता राहणार आहे.
या शिवाय, जनरल सर्जरी व एण्डोस्कोपी, नेत्ररोग, अस्थिरोग, स्पीच थेरपी, फिजिओथेरपी, कान, नाक, घसा, स्त्रीरोग व प्रसूती, बालरोग, दंतचिकित्सा आदी विभाग आहेत. चार शस्त्रक्रिया विभाग असून त्यातील दोन शहरांतील इतर रुग्णालयात अपवादाने असू शकतील, इतकी उत्तम दर्जाची असल्याचे गोविलकर यांनी सांगितले. बाजारातील प्रचलित दरांच्या तुलनेत ६० टक्क्यांत हे सर्व उपचार रुग्णांना मिळू शकतील. केवळ ८० रुपयांत तज्ज्ञ डॉक्टरांची कन्सल्टन्सी आणि त्यानंतर पुन्हा तपासणीसाठी येणाऱ्यांकडून केवळ ६० रुपये शुल्क आकारले जाईल. तसेच रुग्णालयाच्या वास्तूत औषध व चष्मा दुकानाचीही व्यवस्था करण्यात आली आहे. कोणत्याही औषधाच्या खरेदीवर रुग्णांना पाच टक्के सवलत दिली जाणार आहे.