राज्यात दुष्काळाची परिस्थिती आहे. एकीकडे थकबाकी असणाऱ्या शेतकऱ्यांची वीज कापली जात आहे, तर दुसरीकडे मात्र मुख्यमंत्र्यांच्या एका समर्थकाने शाही मेजवानीसाठी चक्क वीज वितरण कंपनीच्या खांबावरून वीज चोरण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या मेजवानीला मुख्ममंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राजकीय पक्षातील दिग्गज, मंत्री आणि प्रशासनातील अधिकारी उपस्थित असताना त्यांच्यादेखत वीज चोरीचा हा प्रकार सुरू होता.
विधिमंडळाचे नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरू असताना नागपूरच्या हिलटॉप परिसरात गुलाबी थंडीत हिलटॉप प्रभागाचे अपक्ष नगरसेवक आणि मुख्यमंत्र्यांचे समर्थक परिणय फुके यांनी बुधवारी रात्री हिलटॉप परिसरात मुख्यमंत्र्यांच्या सन्मानार्थ एका शाही मेजवानीचे आयोजन केले होते. या मेजवानीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यातील अनेक ज्येष्ठ मंत्री, पदाधिकारी, नगरसेवक आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांना आमंत्रित करण्यात आले होते. त्यात भाजपचे माजी खासदार बनवारीलाल पुरोहित, काँग्रेसचे नेते पतंगराव कदम, गृहराज्यमंत्री राम शिंदे, सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकात पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, आमदार रवी राणा, डॉ. सुनील देशमुख, माजी खासदार अजय संचेती, आमदार चैनसुख संचेती आदी विविध पक्षांचे नेते उपस्थित होते. ज्या ठिकाणी ही शाही मेजवानी आयोजित करण्यात आली होती त्या ठिकाणी आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती आणि त्यासाठी चक्क वीज वितरण कंपनीच्या खांबावरून वीज घेण्यात आली होती.
वीज प्रवाहित करणाऱ्या तारांवर वायर टाकून सजविलेल्या शामियानात थेट वीज घेण्यात आल्याचा प्रकार अनेकांच्या नजरेस येत होता. मात्र, त्याकडे सर्व मंडळी दुर्लक्ष करीत होती.
एकीकडे शहरात वीज चोरीचे प्रकार उघडकीस येत असताना गोरगरीब जनतेवर वीज कंपनीचे अधिकारी आणि पोलीस कारवाई करतात. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाते. शिवाय त्यांच्या घरची वीज कापली जाते. असे असताना मुख्यमंत्र्यांचा समर्थक चक्क वीज  कंपनीच्या खांबावरून वीज चोरी करीत असताना त्यांच्यावर मात्र काहीच कारवाई होत नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. शाही मेजवानी वीज चोरीचा प्रकार दिसून येत असताना त्या ठिकाणी वीज कंपनीचे अधिकारी, पोलीस आणि महापालिकेचे अधिकारी उपस्थित असताना त्यांनीसुद्धा या प्रकारावर आक्षेप नोंदविला नाही. शिवाय नागपूरचे महापौर प्रवीण दटके रात्री उशिरा या मेजवानीला गेले. मात्र, त्यांच्या लक्षात हा वीज चोरीचा प्रकार  लक्षात आला नाही का? असा प्रश्न उपस्थित होतो.
नगरसेवक परिणय फुके भाजप समर्थित नागपूर विकास आघाडीमध्ये आहेत. अपक्ष म्हणून ते महापालिकेत निवडून आले असले तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खंदे समर्थक म्हणून ते गेल्या काही दिवसात समोर आले आहेत.
शिवाय फडणवीस यांची मुख्यमंत्रीपदी निवड झाल्यानंतर ते त्यांच्यासोबत मुंबईमध्ये तळ ठोकून होते. फुके यांची शिक्षण संस्था असून त्या संस्थेच्या परिसरात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. नुकत्याच झालेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत दहन घाटावरील लाकूड घोटाळात फुके यांचे नाव समोर आले असून त्यावेळी विरोधी सदस्यांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. त्यावरून सभागृह तहकूब करण्यात आले होते, हे विशेष.

या संदर्भात परिणय फुके यांनी सांगितले, मेजवानीमध्ये वीज खांबावरून वीज घेण्यात आली याची मला काहीच माहिती नाही. मात्र, ज्या कंत्राटदारांकडे विद्युत व्यवस्था देण्यात आली होती त्यांच्याविरोधात कारवाई करणार आहे. वीज वितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता सुरेश मडावी म्हणाले, फुके यांच्या मेजवानीमध्ये वीज चोरीचा प्रकार उघडकीस आला असून त्याची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले. चौकशी झाल्यावर संबंधित कंत्राटदार आणि मालकांवर कारवाई करण्यात येईल.

Story img Loader