नांदेड जिल्हय़ातील राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रम, तसेच नांदेड सामान्य रुग्णालयांतर्गत जन्मजात दुभंगलेले ओठ व टाळू हे व्यंग असलेल्या १८ मुलांवर लातूरच्या लहाने रुग्णालयात मोफत शस्त्रक्रिया करण्यात आल्या. प्लॅस्टिक सर्जन डॉ. विठ्ठल लहाने व त्यांच्या सहकाऱ्यांनी या यशस्वी शस्त्रक्रिया केल्या.
या सर्व मुलांची निवड व तपासणी नांदेडचे शल्यचिकित्सक डॉ. जयपाल चव्हाण, डॉ. उत्तम इंगळे, डॉ. बसवराज लोहारे, डॉ. गोणे व अनिल कांबळे यांनी केली व त्यांना लातूरच्या लहाने रुग्णालयात पाठवले. दुभंगलेले ओठ व टाळू हा सामान्य दोष आहे. योग्य वयात शस्त्रक्रिया केल्यानंतर तो पूर्ण बरा होतो. आजही सर्व सोयी असताना बऱ्याच मुलांवर योग्य वयात ही शस्त्रक्रिया होत नाही. त्यामुळे मुलांना व्यवस्थित बोलता येत नाही आणि त्यांच्या पुढील जीवनात विविध अडचणी निर्माण होतात. योग्य वयात म्हणजे १२ ते १८ महिन्यांतच या मुलांवर शस्त्रक्रिया होणे आवश्यक असते. या व्यंगाच्या रुग्णांवर लहाने रुग्णालय व स्माईल ट्रेन यांच्या वतीने मागील ९ वर्षांपासून दररोज दोन-तीन शस्त्रक्रिया मोफत केल्या जात आहेत. आजपर्यंत साडेपाच हजार शस्त्रक्रिया मोफत करण्यात आल्या आहेत.
या व्यंगाचा रुग्ण कोणत्याही दिवशी, केव्हाही लहाने रुग्णालयात नोंद करू शकतो व त्यावर मोफत शस्त्रक्रिया केली जाते. या कामात डॉ. विठ्ठल लहाने यांना भूलतज्ज्ञ डॉ. राजेश शहा, डॉ. कल्पना लहाने, डॉ. दुष्यंत बुरबुरे, डॉ. वर्धमान उदगीरकर, डॉ. संदीपान साबदे आदींची मदत होते. गरजू रुग्णांनी या संधीचा फायदा घ्यावा, असे आवाहन डॉ. विठ्ठल लहाने यांनी केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा