दोन लाख लोकसंख्या असलेल्या उरण तालुक्यासाठी एकमेव इंदिरा गांधी शासकीय रुग्णालय असून रुग्णालयातील ऑपरेशन थिएटरच्या छताला गळती लागल्याने मागील दोन वर्षांपासून बंद पडलेले होते. त्यामुळे रुग्णालयात कोणत्याच प्रकारची शस्त्रक्रिया होत नव्हती. याचा सर्वात अधिक फटका रुग्णालयात आलेल्या गरीब गरोदर महिलांना बसत होता. त्यामुळे अनेक महिलांना ऐपत नसतानाही गरोदरपणात करण्यात येणाऱ्या सिझरिनसाठी खाजगी रुग्णालयात जाऊन हजारो रुपयांचा खर्च करावा लागत होता. याची दखल घेत येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी छताची तसेच ऑपरेशन थिएटरची दुरुस्ती करून दोन वर्षे बंद पडलेले थिएटर पूर्ववत सुरू केले आहे. त्यानंतर उरणच्या शासकीय रुग्णालयातील ऑपरेशन थिएटरमध्ये अवघ्या तीन ते चार हजारांत एका महिलेचे ऑपरेशन करण्यात आले आहे.
उरण तालुक्यात ट्रॉमाकेअर सेंटर तसेच सुपर स्पेशालिटी रुग्णालय सुरू करण्याच्या वल्गना केल्या जात असताना उरणच्या सर्वसामान्य गरीब जनतेसाठी असलेले शासकीय रुग्णालय अनेक समस्यांनी ग्रासलेले आहे. वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, साधनसामग्री यांची कमतरता असतानाही हे रुग्णालय गरिबांसाठी वरदान ठरत आहे. रुग्णालयात सुविधा उपलब्ध करून घेण्यासाठी प्रयत्नही केले जात आहेत. याची सुरुवात दोन वर्षांपासून बंद पडलेले रुग्णालयातील ऑपरेशन थिएटर सुरू करून करण्यात आलेली आहे. शासकीय रुग्णालयाच्या इमारतीला गळती लागल्याने छतावर परिणाम होऊन पावसाळ्यात थिएटरमध्ये तीन ते चार फूट पाणी साचू लागले होते. त्यामुळे थिएटर निकामी ठरल्याने ऑपरेशन थिएटर असतानाही ते वापरता येत नसल्याने या रुग्णालयात कोणत्याही प्रकारची शस्त्रक्रिया होत नव्हती.
त्यासाठी एक ते दीड तासाचे अंतर पार करीत वाशी येथील महानगरपालिकेचे रुग्णालय गाठावे लागत होते. याचा सर्वात अधिक फटका ग्रामीण तसेच शहरी भागातील गरीब गरोदर महिलांना बसत होता. दरवर्षी उरणच्या ग्रामीण रुग्णालयात ४०० पेक्षा अधिक महिलांचे बाळंतपण केले जाते. यामध्ये दारिद्रय़रेषेखालील, अनुसूचित जात व जमातीमधील महिलांना शासनाकडून मातृत्व भत्ता म्हणून ६०० रुपये दिले जात असल्याची माहिती उरणच्या इंदिरा गांधी शासकीय रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. मनोज बद्रे यांनी दिली आहे. त्यांच्याच प्रयत्नातून ऑपरेशन थिएटरमध्ये गुरुवारी पहिले सिझरिन करून दोन वर्षांपूर्वी माधुरी म्हात्रे या गरोदर महिलेवर उरणमध्ये शस्त्रक्रिया न झाल्याने तिच्या उपचारावर कुटुंबीयांना एक ते दीड लाख रुपयांचा खर्च करावा लागला होता. याच महिलेवर उपचार करून अवघ्या चार ते पाच हजारांच्या खर्चात तिचे बाळंतपण पार पडले आहे. त्याबद्दल या कुटुंबीयांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांचे आभार मानले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व महामुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Operation theater in uran city government hospital
Show comments