सुमारे १७०० विद्यार्थ्यांमध्ये निवडक प्रज्ञावंत २६ विद्यार्थ्यांना माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्याशी संवाद साधण्याची संधी २ मे रोजी मिळणार आहे. ग्रामीण भागातील गुणवत्तेचा शोध घेण्यासाठीआयोजित केलेल्या ‘प्रज्ञा शोध व मूल्य शिक्षण’ उपक्रमांतर्गत प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेण्यात आला आहे.प्रगल्भ, संवेदनशील आणि सक्षम नव्या पिढीचा शोध घेणारा हा उपक्रम आपले वेगळेपण अधोरेखित करणार आहे. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे दोंन्ही गटात २६ पैकी १९ मुलींचा समावेश आहे. या सर्व विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची जबाबदारी पार पाडण्याचा मनोदय संयोजक तीन संस्थांनी घेतला आहे.
जिल्हा परिषद कोल्हापूर, भारती विद्यापीठ आणि प्रेस्टिज कन्सल्टन्सी सव्र्हिसेस कोल्हापूर या तीन संस्थांनी ग्रामीण भागातील लपलेल्या प्रज्ञेचा शोध घेण्याचे ठरविले. त्यासाठी जिल्ह्य़ातील ग्रामीण भागामध्ये निबंध स्पर्धा आयोजित केली. डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या विचारावर आधारित या जिल्हास्तरीय स्पर्धेत ग्रामीण भागातील तब्बल १६७८ विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यातील २५६ निबंध दुसऱ्या फेरीसाठी निवडले गेले. या विद्यार्थ्यांना नवीन विषय देऊन पुन्हा निबंध स्पर्धा घेतली. त्यातून प्राथमिक व माध्यमिक अशा दोन्ही गटातून प्रत्येकी १३ विद्यार्थ्यांची अंतिम फेरीत निवड झाली. विशेष म्हणजे प्राथमिक गटात १३ पैकी १० तर माध्यमिक गटात १३ पैकी ९ मुलींचा समावेश होता. येथेही मुलीनींच बाजी मारल्याचे स्पष्ट झाले.
स्पर्धक विद्यार्थ्यांनी सद्य:स्थितीचे संदर्भ देत विचारपूर्वक निबंध लेखन केले आहे. त्यातून ग्रामीण भागात सुप्त अवस्थेत असलेल्या मुलांच्या विचारांच्या प्रगल्भतेचे दर्शन घडले. बहुतांश विद्यार्थ्यांनी भ्रष्टाचार या विषयाची निवड करून त्याव्दारे व्यक्त केलेली चीड व भावना याची समाजाने गंभीरपणे दखल घ्यावी, असे भावगंभीर चित्रण आहे. तर आईचे माहात्म्य वर्णन करताना वेगवेगळ्या काव्यपगंती, सुविचार, ऐतिहासिक, पौराणिक व्यक्तिरेखांचे उल्लेख नोंद घ्यावे असे आहेत. या लिखानातून त्यांच्या विचारांची स्पष्टता दिसून येते.
विद्यार्थ्यांच्या अवांतर वाचनाचा आणि सद्य परिस्थितीच्या आकलनाचा प्रत्यय त्यांच्या लिखाणातून येतो. निबंध लिहिताना विद्यार्थ्यांनी कोल-गेट, टू-जी-स्पेक्ट्रम, आदर्श घोटाळा अशा आर्थिक र्दुव्यवहारांचे उल्लेख केले आहेत. विविध क्षेत्रांतील भ्रष्टाचाराबाबत विद्यार्थ्यांनी अतिशय तळमळीने पण परखडपणे आपली मते नोंदविली आहेत. त्यामध्ये वैद्यकीय क्षेत्रातील अक्षम्य हलगर्जीपणा, बांधकाम क्षेत्रातील लूटमार, शैक्षणिक क्षेत्रातील दडपशाही तसेच विद्यार्थ्यांबद्दलची अनास्था आणि भ्रष्टाचारी राजकारणी याबद्दलची मुलांनी अतिशय कडक शब्दात विचार मांडले आहेत. प्रसंगी राजकारण्यांची नावे घेऊनही विद्यार्थ्यांनी त्यांचा संताप व्यक्त केला आहे.
अशा या निवडक २६ विद्यार्थ्यांना २ मे रोजी दुपारी ३ वाजता शिवाजी विद्यापीठाच्या सिनेट हॉलमध्ये डॉ.कलाम यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारा संवाद साधण्याची संधी मिळणार आहे. डॉ. कलाम त्यांच्याशी ४० मिनिटे प्रश्नोत्तरे करणार आहेत. तर २० मिनिटे त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे आयोजन प्रेस्टिजचे अध्यक्ष, इस्रोचे निवृत्त वैज्ञानिक डॉ.आर.व्ही.भोसले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.दीपक म्हैसेकर, भारती विद्यापीठाचे संचालक डॉ.व्ही.एम.चव्हाण, समन्वयक रंगनाथ आद्य आदींनी केले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा