भंडारा जिल्हा बंद, गोंदियात भाजप महिला मोर्चाकडून निषेध
लाखनी (मुरमाडी) येथील तीन बहिणींवरील अमानुष हत्याकांड व पोलिसांच्या बेपर्वाईच्या निषेधार्थ, तसेच आरोपींना त्वरित अटक व्हावी, या मागणीकरिता भाजपने दिलेल्या जिल्हा बंदच्या आवाहनाला या दोन्ही जिल्ह्य़ात सर्वत्र उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
भंडाऱ्यात आज चित्रपटगृहे, सर्व व्यापारी प्रतिष्ठाने, तसेच शाळा-महाविद्यालये बंद होती. मंगळवारी शिवसेनेचे आमदार नरेन्द्र भोंडेकर यांच्या नेतृत्वाखाली भंडारा येथे जिल्हाधिकारी कार्यालय चौकात, तसेच मोहाडी येथे शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष राधेशाम गाढवे, साकोली येथे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख राजेन्द्र हटनागर, पवनी येथे पवनीचे नगराध्यक्ष मोहन सुरकर, तुमसर येथे उपजिल्हाप्रमुख शेखर कोतपल्लीवार, लाखनीत लवकुश निर्वाण यांच्या नेतृत्वाखाली तेथील तहसील कार्यालयासमोर ११ ते ५ वाजेपर्यंत धरणे आंदोलन करून आरोपींना पकडण्यात अपयश आले तर अधिक तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. मुख्यमंत्री नागपूरला आमदारच्या मुलीच्या लग्नाला या काळात हजेरी लावू शकतात, मात्र पीडित कुटुंबीयांचे सांत्वन करण्यास त्यांच्याकडे वेळ नाही. पालकमंत्रीही घटनास्थळी येण्याकरिता मुख्यमंत्र्यांच्या आदेशाची वाट बघतात. यातून राज्यकर्त्यांची संवेदनशून्यताच प्रकट होते, अशी प्रतिक्रियाही आमदार भोंडेकर यांनी व्यक्त के ली. आरोपींच्या शोधासाठी पोलिसांच्या २० चमू कार्यरत आहेत. आरोपींची माहिती देणाऱ्यांनी ०७१८४-२५२७८० आणि ९८५०६३५२५० या क्रमांकावर माहिती द्यावी. त्यांचे नाव गुप्त ठेवण्यात येईल.
या घटनेचा आज गोंदिया भाजप महिला मोर्चाने निषेध नोंदवित जिल्हाधिकाऱ्यांना या घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा करा व गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी जिल्हाधिकारी अमित सनी यांना देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आली आहे. या हत्याकांडातील तपासात लाखनी पोलिसांनी दिरंगाई केली आहे. त्यामुळे त्या नराधमांना पसार होण्यात मदत झाली. अशा पोलीस अधिकाऱ्याला कठोर शिक्षा देण्यात यावी, तसेच निरपराध मुलींचा बळी घेणाऱ्या राक्षसी वृत्तीच्या आरोपींना त्वरित अटक करून त्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदन देताना भाजप महिला मोर्चाची जिल्हाध्यक्ष रचना गहाणे, सभापती सविता पुराम, जि.प.सदस्य सीता रहांगडाले, किरण कांबळे, संगीता दोनोडे, भाजपच्या दीपा काशिवार आदींसह भाजप जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल, जिल्हा परिषद अध्यक्ष विजय शिवणकर, माजी जि.प.अध्यक्ष नेतराम कटरे, माजी आमदार केशव मानकर, हेमंत पटले, नगरसेवक दिनेश दादरीवाल, अशोक इंगळे, संजू कुलकर्णी, भावना कदम, अभय अग्रवाल, संजू मुरकुटे, अमीत अवस्थी, संतोष शर्मा, बाळा अंजनकर आदी उपस्थित होते.
लाखनीतील तीन बहिणींच्या हत्येचा निषेध
लाखनी (मुरमाडी) येथील तीन बहिणींवरील अमानुष हत्याकांड व पोलिसांच्या बेपर्वाईच्या निषेधार्थ, तसेच आरोपींना त्वरित अटक व्हावी, या मागणीकरिता भाजपने दिलेल्या जिल्हा बंदच्या आवाहनाला या दोन्ही जिल्ह्य़ात सर्वत्र उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
First published on: 21-02-2013 at 05:15 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Opposed in bhandara for three sisters murdered