तालुक्यातील मुकणे व दारणा धरणातून आवर्तनाच्या माध्यमातून नगर जिल्ह्य़ातील राहाता, कोपरगावसह मराठवाडय़ाला पाणी सोडण्याचा प्रयत्न होत असल्यानेच मनसेने मुकणे धरणाचे पाणी रोखले, तर दारणाचे पाणी सोडण्यास शेतकऱ्यांची हरकत असतानाही सोडण्यात आले. मुकणे आणि दारणाच्या पाण्यावरून धरणग्रस्तांचा संघर्ष सुरू असतानाच आता त्यात वैतरणाचे अतिरिक्त पाणी मुकणे धरणात टाकून गोदावरी खोऱ्यात वळविण्याचा घाट जलसंपदा विभागाने घातला आहे. मात्र या प्रयत्नांना माजी आमदार काशीनाथ मेंगाळ आणि अॅड. रतनकुमार इचम यांनी हा प्रयत्न हाणून पाडण्याचा इशारा दिला आहे.
वैतरणा धरणाचे अतिरिक्त पाणी मुकणे धरणात टाकून ते गोदावरी खोऱ्याकडे अर्थात नगर, मराठवाडय़ाकडे वळविण्याचा जलसंपदा विभागाचा प्रस्ताव आहे. या प्रस्तावावर सहमती घडविण्यासाठी स्थानिक आजी-माजी लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत ६ डिसेंबर रोजी इगतपुरी तहसील कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली आहे.
या बैठकीची माहिती कळताच धरणग्रस्त शेतकरी आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. पाणी सोडण्याच्या या प्रस्तावाला यापूर्वीही स्थानिकांनी विरोध करीत त्याबाबत सर्वेक्षणासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना पिटाळून लावले होते.
जलसंपदा विभागाने याबाबत स्थानिक धरणग्रस्त आणि लोकप्रतिनिधींमध्ये समन्वय घडवून या प्रस्तावाला अनुकूल स्थिती निर्माण करणे व अडथळे दूर करण्याची जबाबदारी स्थानिक अधिकाऱ्यांवर टाकली आहे. त्या अनुषंगाने आ. निर्मला गावित, माजी आमदार काशीनाथ मेंगाळ, शिवराम झोले, प्रांताधिकारी, जलसंपदा विभागाचे अधिकारी आदींची बैठक होणार आहे.
धरणग्रस्तांना न्याय देण्याऐवजी पाणी पळविण्यास शासन प्राधान्य देत असल्याची भावना होत असून वैतरणा धरणातील अतिरिक्त पाणी पाटाद्वारे मुकणे धरणात टाकून गोदावरी खोऱ्याकडे वळविण्याचा प्रयत्न मनसेच्या माध्यमातून हाणून पाडण्याचा इशारा मेंगाळ, इचम, मराडे आदींनी दिला आहे.
वैतरणाचे पाणी गोदावरी खोऱ्यात वळविण्यास विरोध
तालुक्यातील मुकणे व दारणा धरणातून आवर्तनाच्या माध्यमातून नगर जिल्ह्य़ातील राहाता
आणखी वाचा
First published on: 06-12-2013 at 07:18 IST
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Opposed to divert the water of vaitarna to godavari