मुंबईतील निवडक कनिष्ठ महाविद्यालयातील अकरावी प्रवेशासाठी ‘राज्य शिक्षण मंडळा’च्या दहावीच्या (एसएससी) विद्यार्थ्यांना सीबीएसई, आयसीएसई विद्यार्थ्यांशी करावी लागणारी कडवी स्पर्धा हे आतापर्यंतचे सर्वसाधारण चित्र असले तरी ते आता बदलत चालले आहे. कारण, सीबीएसई, आयसीएसईचे विद्यार्थी मोठय़ा संख्येने अकरावीसाठी त्यांच्याच किंवा इतर केंद्रीय शिक्षण मंडळाशी संलग्नित कनिष्ठ महाविद्यालयांमध्येच प्रवेश घेणे पसंत करू लागले आहेत. लक्षात घेण्याजोगी बाब म्हणजे दहावीपर्यंत राज्य शिक्षण मंडळाच्या शाळेत शिकलेले विद्यार्थीही मोठय़ा संख्येने अकरावीकरिता केंद्रीय शिक्षण मंडळाला, त्यातही प्रामुख्याने सीबीएसईला प्राधान्य देऊ लागले आहेत.
२०१२मध्ये एसएससीच्या ३००० विद्यार्थ्यांनी इतर शिक्षण मंडळात प्रवेश घेण्यासाठी ‘स्थलांतरीत प्रमाणपत्र’ घेतले. त्या आधीच्या वर्षी ८०० विद्यार्थ्यांनी हे प्रमाणपत्र घेतले होते. त्या तुलनेत इतर शिक्षण मंडळातील विद्यार्थ्यांना राज्य शिक्षण मंडळाच्या कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी लागणाऱ्या पात्रता प्रमाणपत्रांची संख्या फारशी वाढलेली नाही. २००९मध्ये सीबीएसई, आयसीएसई, आयबीच्या १२,४४३ विद्यार्थ्यांना राज्य शिक्षण मंडळाच्या कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेशासाठी लागणारे पात्रता प्रमाणपत्र देण्यात आले होते. गेल्या वर्षी ही संख्या १२,९६५च्या आसपास होती.
शाळाचालकांच्या मते अभियांत्रिकी, वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी राज्याच्या प्रवेश परीक्षा रद्द करून केंद्रीय स्तरावर एकच सीईटी घेण्याचे धोरण याला कारणीभूत ठरू लागले आहे. कारण, जेईई, नीट या केंद्रीय स्तरावरील सीईटी सीबीएसईच्या अकरावी-बारावीच्या अभ्यासक्रमावर बेतलेल्या असतात. या बदलाला आणखीही एक तात्कालिक कारण ठरले ते म्हणजे सीबीएसईच्या शाळा स्तरावरील परीक्षेचे.
शाळा स्तरावर परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना अकरावीला प्रवेश नाकारण्याचा पावित्रा राज्य शिक्षण मंडळाने घेतल्याने दोन वर्षांपूर्वी या विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा मोठा गोंधळ निर्माण झाला होता. अखेर सीबीएसईच्या विनंतीवरून मंडळाने इतर प्रवेश झाल्यानंतर या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल, अशी नरमाईची भूमिका घेऊन त्यांच्या प्रवेशाचा प्रश्न सोडविण्यात आला. पण, आपल्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत अशी अडचण पुन्हा उद्भवू नये म्हणून सीबीएसईने आपल्या शाळांना अकरावी-बारावीच्या तुकडय़ा नव्याने वा वाढीव सुरू करण्यास प्रोत्साहन दिले. तेव्हापासून अकरावीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेतही सीबीएसईचे विद्यार्थी तुलनेत कमी झाले आहे. अकरावीला ऑनलाईनमध्ये सीबीएसईच्या विद्यार्थ्यांच्या येणाऱ्या अर्जाच्या संख्येवरून ही गोष्ट स्पष्ट होते.
काही सीबीएसई-आयसीएसई शाळांनी नीट, जेईई या प्रवेश परीक्षांच्या तयारीकरिता खासगी क्लासचालकांशी केलेले ‘टायअप’ देखील या शाळांकडे मुलांचा ओढा वाढण्यास कारणीभूत ठरला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचीही सोय होते आणि शाळेलाही प्रत्येक विद्यार्थ्यांमागे क्लासचालकांकडून ‘कमिशन’ मिळते. सांताक्रूझच्या आर. एन. पोद्दार शाळेत तर दहावीपेक्षा अकरावी-बारावीची प्रवेशक्षमता जास्त आहे. इतकेच नव्हे तर या शाळेत वैद्यकीय आणि अभियांत्रिकी प्रवेशेच्छुक विद्यार्थ्यांचे वर्गच स्वतंत्र आहेत. त्यामुळे, या शाळांकडे अकरावीच्या प्रवेशासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अर्जाची संख्या वाढतेच आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा