दहन घाटांवरील लाकडासंदर्भात प्रशासनाने लेखा परीक्षण अहवाल दिल्यानंतर त्यात मोठा भ्रष्टाचार झाल्याचे उघड झाल्यामुळे संबंधित लाकूड पुरवठा करणाऱ्या कंपनीवर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी करून विरोधी पक्षाच्या सदस्यांनी सभागृहात घोषणा देत महापौरांसमोर निदर्शने केली आणि त्यांच्या आसनासमोर अहवालाचे कागद भिरकावले. या गोंधळातच पटलावरील अन्य विषयांना मंजुरी देऊन सभा अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आली.
महापालिकेची नगरभवनात सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती. सभेला प्रारंभ झाल्यानंतर प्रश्नोत्तराच्या तासात विरोधी पक्ष नेते विकास ठाकरे यांनी दहन घाटावरील लेखा परीक्षणाच्या अहवालाचा आधार घेऊन दहन घाटावरील लाकूड पुरवठाचा मुद्दा उपस्थित करून संबंधित लाकूड पुरवठा करणाऱ्या कंत्राटदाराविरोधात गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली. लाकडाचा पुरवठा करण्याचे कंत्राट कुणाकडे आहे, त्यात कोणाचे हितसंबंध गुंतले आहेत, याची चौकशी करावी, अशी मागणी करून ठाकरे यांनी प्रशासनाला जाब विचारला. प्रशासन आणि महापौर प्रवीण दटके यांनी या प्रकरणाची कायद्याच्या चौकटीत बसून अहवालात जे काही दोष असतील आणि त्यात काही अनियमितता असेल तर त्याची चौकशी करून संबंधित कंपनीवर गुन्हा दाखल करण्यात येईल, असे निर्देश दिले. मात्र, विरोधी पक्षाच्या सदस्यांचे त्यांच्या उत्तराने समाधान न झाल्याने त्यांनी महापौरांच्या आसनासमोर जाऊन सत्ता पक्षाच्या विरोधात घोषणा देणे सुरू केले. अहवालाचे कागद यावेळी महापौरांवर भिरकवण्यात आली.
सभागृहात गोंधळ सुरू सुरू असताना महापौर या प्रकरणासंदर्भात निर्देश देत होते, मात्र विरोधी पक्ष गुन्हा दाखल करण्यासंदर्भात लगेच निर्देश द्या, अशी मागणी करीत होते. घोषणा सुरू असताना पाच मिनिटासाठी सभागृह तहकूब करण्यात आले. त्यानंतर पुन्हा सभेला सुरुवात झाल्यानंतर पुन्हा तीच मागणी रेटत विरोधी पक्षांनी गोंधळ सुरू ठेवला आणि त्या गोंधळातच पटलावरील सर्व विषयाला मंजुरी देत सभागृह अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आले.
यावेळी विकास ठाकरे म्हणाले, शहरातील दहन घाटावरील लाकडाचे कंत्राट महेश सेल्स कार्पोरेशनकडे असून नितीन फुके आणि महेश बारंगे मालक आहेत. १४४, परिणय अपार्टमेंट, हिलटॉप अंबाझरी हा कंत्राटदाराचा पत्ता असल्यामुळे नेमके हे कंत्राट कुणाकडे आहे, अहवालामध्ये अनियमितता आल्यानंतर त्यांचे कंत्राट काऴ्ा यादीत का टाकले नाही, त्यात कोणाचे हितसंबंध जपले आहेत, याची चौकशी करण्याची मागणी यावेळी त्यांनी केली. महेश सेल्स कार्पोरेशन या कंपनीने भ्रष्टाचार केला आहे हे उघड असताना प्रशासन आणि सत्तापक्ष त्यांच्यावर कारवाई का करीत नाही? असा प्रश्न यावेळी उपस्थित केला. अन्य कंपनीच्या निविदा असताना त्यात कंपनीला कंत्राट का देण्यात आले, याची चौकशी करावी, अशी मागणी ठाकरे यांनी केली.
कंत्राटदाराची सत्तापक्ष पाठराखण करीत असून वकिलांकडे पैसे पोहोचविले जाताता, असा आरोप ठाकरे यांनी यावेळी केला. या आरोपावर सत्तापक्षाच्या नेत्यांनी आक्षेप घेत ठाकरे यांनी विधान मागे घ्यावे, अशी मागणी केली. पुरवठा कमी आणि प्रशासनाकडून पैसा दुप्पट घेण्यात आला आहे. एकाच गाडीचे दोन देयके कशी देण्यात आली? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. घाटावर निशुल्क सेवा उपलब्ध व्हावी या दृष्टीने अनेक सामाजिक संघटना जुळल्या असताना अशा भ्रष्टाचार करणाऱ्या कंपनीला कंत्राट देण्याचे कारण काय? असा प्रश्न उपस्थित केला. या सर्व प्रकरणाची चौकशी होऊन कंत्राटदारावर तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी सभागृहात काँग्रेस सदस्यांनी केली. या गोंधळातच सभागृह अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आले. बहुजन समाज पक्षाचे गटनेते किशोर गजभिये यांनी या प्रकरणाची चौकशी करून तात्काळ संबंधित कंत्राटदारावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली.
या संदर्भात महापौर प्रवीण दटके म्हणाले, महापौर प्रवीण दटके म्हणाले, दहन घाटांच्या लेखा परीक्षण अहवालावरून विरोधी पक्षाच्या सदस्यांनी घातलेला गोंधळ सभागृहाला शोभेसा नाही. कायद्याच्या चौकटीत बसून या प्रकरणाची चौकशी करताना संबंधित कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची तरतूद असेल तर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल. मात्र, त्याबाबत विरोधी पक्ष काही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नाही. कंत्राट कोणाकडेही असो, त्यांना पाठीशी घालणार नाही, असेही दटके म्हणाले.
महापालिका सभेत विरोधकांचा गदारोळ
दहन घाटांवरील लाकडासंदर्भात प्रशासनाने लेखा परीक्षण अहवाल दिल्यानंतर त्यात मोठा भ्रष्टाचार झाल्याचे उघड झाल्यामुळे संबंधित लाकूड पुरवठा करणाऱ्या कंपनीवर गुन्हा दाखल करण्यात यावा,
First published on: 06-12-2014 at 03:57 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Opposition create mess municipal council meeting