महापालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदी अपक्ष नगरसेवकांच्या शहर विकास आघाडीचे गुलाब माळी यांची, तर सभागृह नेतेपदी राष्ट्रवादीचे कमलेश देवरे यांची निवड करण्यात आली आहे. महापालिकेतील विरोधी पक्ष शिवसेनेला व्यवस्थितपणे बाजूला करीत राष्ट्रवादीने सत्तेसह सर्वच पदे आपल्या मर्जीत ठेवण्याची खेळी केली आहे. या निवडीला शिवसेनेने तीव्र विरोध केला असून, सत्ताधाऱ्यांच्या या कृतीविरुद्ध न्यायालयात जाण्याचा इशारा शिवसेनेने दिला आहे.
महापालिकेवर एकहाती सत्ता मिळविल्यावर विरोधी पक्षही आपल्याकडेच ठेवण्याचा डाव राष्ट्रवादीने यशस्वीरीत्या अमलात आणला. महापालिकेत राष्ट्रवादीने सर्वाधिक ३४ जागा जिंकल्या. ११ सदस्य असलेला शिवसेना संख्याबळाच्या आधारे दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष आहे. त्यामुळे नियमानुसार विरोधी पक्षनेतेपद शिवसेनेकडे जाणे आवश्यक आहे. राष्ट्रवादीने अपक्षांना हाताशी धरून शिवसेनेला विरोधी पक्षनेतेपदापासूनही दूर केले. अपक्षांनी समाजवादी पक्षाला सोबत घेत १२ सदस्यांची शहर विकास आघाडी स्थापन केली. तांत्रिकदृष्टय़ा ही आघाडी सत्ताधाऱ्यांनंतर दुसऱ्या क्रमांकावर येत असल्यामुळे या आघाडीचे गुलाब माळी यांना विरोधी पक्षनेतेपद बहाल करण्यात आले. सभागृह नेतेपदी राष्ट्रवादीचे कमलेश देवरे यांची निवड करण्यात आली. दरम्यान शहर विकास आघाडीने महापौर, उपमहापौर निवडीत राष्ट्रवादीला पाठिंबा दिला असताना या गटाचा विरोधी पक्षनेता कसा काय होऊ शकतो, असा प्रश्न सेना-भाजपसह विरोधकांकडून उपस्थित केला जात आहे.
शिवसेनेचे गटनेते संजय गुजराथी यांनी विरोधी पक्षनेतेपदासाठी संजय जाधव यांच्या नावाची शिफारस करून तसे पत्रही महापौरांना दिले होते. मात्र राष्ट्रवादीने या पत्राला एकप्रकारे केराची टोपली दाखवली. राष्ट्रवादीने विरोधी पक्षनेतेपदाचा आमचा हक्क एका अर्थाने हिरावला आहे. या निर्णयाला आम्ही न्यायालयात आव्हान देणार आहोत. ज्यांनी महापौर, उपमहापौर निवडीत हात उंचावून पाठिंबा दिला आहे. ते आता त्यांना विरोध कसा करतील, असा सवाल या निवडीवर महानगरप्रमुख भूपेंद्र लहामगे यांनी केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा