बनवाबनवी व लोकांच्या खिशांवर डोळा ठेवणे एवढाच एककलमी कार्यक्रम विरोधकांकडे असल्याचे सांगतानाच मांजर डोळे मिटून दूध पीत असले तरी समाजाचे डोळे उघडे असतात याचे भान ते विसरले आहेत, अशी टीका आमदार विजय औटी यांनी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे यांचे नाव न घेता केली.
तालुक्यातील सावरगाव येथील विविध विकासकामांचे उद्घाटन आमदार विजय औटी यांच्या हस्ते झाले. या वेळी ते बोलत होते. खंडोबा देवस्थानचे अध्यक्ष पांडुरंग गायकवाड कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. युवक नेते अनिकेत औटी, सभापती सुदाम पवार, उपसभापती अरुणा बेलकर, माजी सभापती गंगाराम बेलकर, उद्योजक रामदास भोसले, अशोक कटारिया आदी या वेळी उपस्थित होते.
तालुक्यातील एका कार्यक्रमात सुजित झावरे यांनी विकासकामांसाठी आमदार औटी निधी कोठून आणतात असे सांगत टीका केली होती. त्याला औटी यांनी सावरगावच्या मेळाव्यात प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, राजकारणात महत्त्वाकांक्षा असणे गैर नाही. महत्त्वाकांक्षी माणसेच राजकारणात येतात. परंतु तालुक्याचा बुद्ध्यांक समजावून घेणे गरजेचे आहे. खोटे बोलणे खपवून घेतले जाणार नाही.
तालुक्यातील जनता निश्चितच सुज्ञ आहे. आपण बालबुद्घी समजू शकतो, परंतु हा पोरखेळ नाही. लोकांच्या जीवनाशी खेळ करण्याचा प्रयत्न करू नका, आम्ही सम्राट नाहीत किंवा अमरपट्टा घेऊनही जन्मालाही आलेलो नाही. सत्ता आज आहे, उद्या नसेल. मी एखाद्या गावात गेलो तर क्षणार्धात शंभर माणसे भोवती जमा होतील हीच माझी संपत्ती आहे, ही संपत्ती मिळविण्याचा प्रयत्न करा असा टोलाही औटी यांनी लगावला.
 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा