महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे प्रथमच धुळे आणि जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत असल्याने पक्षाच्या कार्यकर्त्यांप्रमाणेच विरोधकांमध्येही त्यांच्या या दौऱ्याविषयी कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे या दोन्ही जिल्ह्यांमध्ये मनसेचे विशेष जाळे नसताना आजपर्यंत उत्तर महाराष्ट्रात नाशिक येथेच जाहीर सभा घेणाऱ्या राज ठाकरे यांनी जाणीवपूर्वक जळगाव येथे सात एप्रिल रोजी जाहीर सभेचे आयोजन केले आहे. शहरात होणारी त्यांची ही पहिलीच सभा असल्याने सभेच्या तयारीवर विशेष लक्ष देण्यासाठी पक्षाच्या जिल्हा संपर्क नेत्यांनी येथे तळ ठोकला आहे. दरम्यान, राज यांचा दौरा सुरू होण्यापूर्वीच विरोधकांनी या दौऱ्याची कशी दखल घेतली आहे ते जाणवण्यास सुरूवात झाली आहे. धुळे येथे मनसेचा फलक फाडण्यात आल्याची घटना घडली असून याप्रकरणी पोलिसात तक्रारही दाखल करण्यात आली आहे. नंदुरबार, धुळे व जळगाव येथे रवाना होण्यापूर्वी ठाकरे हे नाशिक येथील पदाधिकाऱ्यांना तसेच आपल्या महापौरांना कामासंदर्भात कोणता उपदेश करतात, हेही महत्वपूर्ण ठरणार आहे. शिवसेनेत असल्यापासून नाशिकवर प्रेम करणाऱ्या राज ठाकरे यांच्या मनसेने पहिली महापालिका ताब्यात घेतली तीही नाशिकची. परंतु महापालिकेच्या सत्तास्थानी येऊन वर्ष पूर्ण झाले तरी सत्ताधारी मनसे आपला विशेष प्रभाव पाडण्यात यशस्वी झालेली नाही. ही संधी साधत विरोधकांकडून मनसेच्या कारभारावर टीकास्त्र सोडण्यात येऊ लागले. या पाश्र्वभूमीवर ठाकरे हे महापौरांसह पक्षाचे आमदार, पदाधिकाऱ्यांच्या कामकाजाचा आढावा घेणार असून शहरातील विकास कामांच्या दृष्टिने त्यांच्याकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे. नाशिकनंतर ठाकरे नंदुरबार व धुळे येथे जाणार असून जळगाव येथे रविवारी त्यांची जाहीर सभा होणार आहे.
ठाकरे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर यापूर्वीही येऊन गेले असले तरी शहरात त्यांची प्रथमच जाहीर सभा होणार आहे. सागर पार्कवर होणारी ही सभा उत्तर महाराष्ट्रस्तरीय असल्याने सभेला विक्रमी उपस्थिती राहील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. तसे गृहित धरूनच सभेची जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी मनसेचे जिल्हा संपर्क नेते विनय भोईटे व गजानन राणे दोघेही जळगावात दाखल झाले आहेत. मनसेचे प्रदेश सरचिटणीस माजी आमदार जयप्रकाश बाविस्कर यांनी राज ठाकरे हे शनिवारी सायंकाळी जळगावमध्ये पोहोचतील, अशी माहिती दिली. रविवारी सकाळपासूनच ते जिल्ह्यातील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत. आठ एप्रिल रोजी न्यायालयीन कामासाठी ठाकरे हे दुपापर्यंत जळगावमध्येच थांबणार आहेत. २८ ऑक्टोबर २०१० रोजी मनसेने केलेल्या आंदोलनावरून पक्षाध्यक्ष ठाकरे यांच्यासह स्थानिक पदाधिकाऱ्यांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आलेला असून यापूर्वी चोपडा आणि भडगाव न्यायालयात ठाकरे हे उपस्थित झाले असल्याचेही अॅड. बाविस्कर यांनी नमूद केले.
मनसेच्या फलकाची तोडफोड
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे शहरात आगमन होण्यापूर्वीच पक्षाचा फलक कोणीतरी फाडल्याचे निदर्शनास येताच मंगळवारी शहरातील बारा पत्थर चौकात मोठय़ा प्रमाणात कार्यकर्त्यांनी गर्दी केली. मनसेच्या वतीने या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. ठाकरे यांच्या झंझावती दौऱ्यामुळे सत्ताधाऱ्यांच्या पायाखालची वाळू घसरत असल्याने अशा अप्रिय घटना घडू शकतात, अशी प्रतिक्रिया मनसेचे उपजिल्हा प्रमुख अजित राजपूत यांनी व्यक्त केली आहे. मंगळवारी मनसे जिल्हाप्रमुख बबन जिरेकर व अन्य पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संपर्क प्रमुख दत्तात्रय बेलनेकर यांनी बैठक घेतली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र दौऱ्यातंर्गत खान्देश हा शेवटचा टप्पा आहे. नंदुरबार जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधल्यानंतर गुरूवारी सायंकाळी धुळे येथील विश्राम गृहावर त्यांचे आगमन होणार आहे. मुक्कामानंतर दुसऱ्या दिवशी शुक्रवारी सकाळी नऊ ते बारा या वेळेत ठाकरे हे तालुक्याच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार असून त्यानंतर ते जळगावकडे प्रयाण करतील अशी माहिती बेलनेकर यांनी दिली.