लग्न समारंभ, साखरपुडा तसेच इतर कौटुंबिक कार्यक्रमांसाठी अव्वाच्या सव्वा दर आकारणी करून नवी मुंबईकरांना अक्षरश: नाडणाऱ्या मोठमोठय़ा हॉल मालकांच्या एकाधिकारशाहीला नवी मुंबई महापालिकेने उशिरा का होईना आव्हान उभे करण्याचा निर्णय घेतला आहे. सर्वसामान्यांपासून उच्चंभ्रूपर्यंत सर्व वर्गातील नागरिकांना सोयीचे पडेल आणि आर्थिकदृष्टय़ा किफायतशीर ठरेल, असे मंगल कार्यालय उभारण्याची प्रक्रिया महापालिकेने सुरू केली आहे. ऐरोली सेक्टर-५ येथे चार मजल्यांचे सुसज्ज असे पहिले मंगल कार्यालय उभारण्याची निविदा मंजूर झाली असून येत्या महिनाभरात यासंबंधीच्या कामाला सुरुवात होणार आहे.
मंगल कार्यासाठी मुहूर्तानुसार पुरेशा प्रमाणात सभागृह उपलब्ध होत नाही, हे सध्या सर्वच शहरांमधील नागरिकांचे दुखणे आहे. ठाणे, नवी मुंबईसारख्या मोठय़ा शहरांमध्ये काही ठराविक हॉल मालकांच्या एकाधिकारशाहीमुळे १००, १५० जणांच्या उपस्थितीत साखरपुडा उरकतानाही सर्वसामान्यांना ५० ते ६० हजार रुपये मोजावे लागतात असा अनुभव आहे. वातानुकूलित सभागृह मिळवताना तर अक्षरश: नाकीनऊ येतात. एखादे सभागृह भाडय़ाने घेताना त्याच ठिकाणाहून केटिरगची व्यवस्थाही लादली जाते. त्यामुळे चढय़ा दराने जेवणाची किंवा अल्पोपहाराची व्यवस्था स्वत:वर लादून घेण्याशिवाय ग्राहकांपुढे पर्याय राहात नाही. नवी मुंबईसारख्या मोठय़ा नगरात काही ठराविक संस्थांच्या सभागृहांना मोठी मागणी येऊ लागल्याने त्या ठिकाणी मंगलकार्य आयोजित करण्यासाठी मोठय़ा रकमा आकारल्या जातात. मुहूर्ताच्या काळात सभागृहाच्या तारखा जुळून येत नाहीत. त्यामुळे काही ठिकाणी तर दुपट्ट दर आकारणी करण्याची पद्धत सुरू करण्यात आली आहे.
महापालिका थाटणार मंगल कार्यालये
या प्रश्नाचा आवाका लक्षात घेऊन नवी मुंबई महापालिकेने स्वत:च्या मालकीची मंगल कार्यालये सुरू करण्याचा निर्णय वर्षभरापूर्वी घेतला. गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पात तत्कालीन आयुक्त भास्कर वानखेडे यांनी अशा स्वरूपाच्या मंगल कार्यालयांसाठी खास तरतूद केली. भास्कररावांचे हे प्रयत्न त्यांच्या निवृत्तीनंतर प्रत्यक्षात उतरू लागले असून ऐरोली सेक्टर-५ येथे तब्बल १६ कोटी रुपयांचा खर्च करून चार मजल्यांचे मंगल कार्यालयाचे काम सुरू करण्यात येणार आहे. या मंगल कार्यालयात पहिल्या आणि तिसऱ्या मजल्यावर मोठे आणि उर्वरित दोन मजल्यांवर लहान सभागृह उभारले जाणार आहेत, अशी माहिती महापालिकेचे शहर अभियंता मोहन डगावकर यांनी वृत्तान्तला दिली. यापैकी काही सभागृह वातानुकूलित असतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. सिडकोच्या जुन्या समाजमंदिराच्या भूखंडावर हे नवे बांधकाम केले जाणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. ऐरोलीपाठोपाठ इतर उपनगरांमध्ये अशा प्रकारच्या बहुउद्देशीय इमारती बांधण्याचा प्रस्ताव आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यासंबंधीची प्रक्रिया सुरू असून वाशी शहरात अशा  प्रकारच्या दोन इमारती उभारण्यात येतील, असे डगावकर यांनी स्पष्ट केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा