शेतात धानाची पारंपरिक पद्धतीने लागवड न करता फेकून किंवा पेरणी करून लागवड केल्यास उत्पादन खर्चात बचत होत असल्याचे निदर्शनास आले आहे. नागपूर विभागात धानाच्या लागवडीसाठी पेरणी किंवा फेकीव पद्धतच अधिक वापरली जात आहे.
शेतात कामासाठी मजूर मिळत नाहीत, त्यांच्या मजुरीचे दरही खूप वाढले आहेत. खत व बियाण्यांचे वाढलेले दर, नैसर्गिक आपत्ती, धान लागवड व काढणी करताना होणारी मजुरांची ओढाताण यामुळे खर्च अधिक व उत्पादन कमी अशा दुष्टचक्रात धान उत्पादक सापडतो. नागपूर विभागाच्या धान पट्टय़ात साधारणपणे जूनच्या तिसऱ्या आठवडय़ात पारंपरिक पद्धतीने धानाची लागवड केली जाते. यामुळे उत्पादन खर्च वाढत आहे, याला अनेक शेतक ऱ्यांनी पर्याय शोधला आहे. धानाची चिखलवणी पद्धतीने पेरणी न करता शेतात धान फेकून किंवा पेरणी केली जाते. यामुळे वेळ, श्रम व पैशाची बचत होत असल्याचे आढळून आल्याने विभागात ही पद्धत प्रचलित होत आहे. या पद्धतीने धानाची लागवड केल्यास प्रतिएकर दहा हजार रुपयांचा बचत होत असल्याचे शेतकरी नेते संजय सत्येकार यांनी सांगितले. धानाचा उत्पादन खर्च वाचविण्यासाठी ही पद्धत सर्वदूर पोहोचविण्याची गरज आहे. पारशिवनी तालुक्याचे कृषी विभागाचे मंडल कृषी अधिकारी मोहन सवाई प्रशिक्षणाच्या माध्यमातून प्रसार करीत आहेत. धानाची परे टाकून लावगड केल्यास शेती मशागत, बियाणे, परे टाकण्याचा खर्च, खत, कापणी व काढणी आदी कामांसाठी प्रतिएकर उत्पादन खर्च २२ हजार रुपये येतो तर पेरणी किंवा फेकीव पद्धतीने लागवड केल्यास १२ हजार रुपये उत्पादन खर्च येतो. पेरणी व फेकीव पद्धतीत धानाचे फुटवे १५ दिवस अगोदर येतात, त्यामुळे उत्पादन वाढते. शेतक ऱ्यांनी अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर शेतीच्या मशागतीची कामे सुरू करून खते व बियाण्यांसाठी जुळवाजुळव केली जात आहे. सध्या नांगरणीची कामे सुरू आहेत. गेल्या खरीप हंगामात नागपूर विभागात १८ लाख, ५८ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती. या खरीप हंगामात शेतकऱ्यांना धानाच्या उत्पादन खर्चाला पर्याय म्हणून पेरणी व फेकीव पद्धतच उपयुक्त ठरणार आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा